पत्रकार विश्वास पाटील यांच्यासह १३ जणांवर अॅट्रॉसिटी सह गुन्हा दाखल : शाहुवाडीतील पारीवणे येथील घटना
मलकापूर प्रतिनिधी : शाहुवाडी तालुक्यातील पारीवणे येथील शेतजमिनीच्या वादातून सर्जेराव पोवार यांस जबर मारहाण तसेच अपहरण, अॅट्रॉसिटी आदी गुन्हे पत्रकार विश्वास शामराव पाटील याच्यासह १३ जणांच्या विरोधात शाहुवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाले असून,यापैकी ९ जणांची नावे निश्चित झाली आहेत. अन्य चार जण व गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या वाहनांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपाधीक्षक आर.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.
याबाबत पोलीस ठाणे व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कि, पारीवणे तालुका शाहुवाडी येथील सर्जेराव गणपती पोवार यांची वाहिणी इंदुबाई यशवंत पोवार यांच्या नावावर पारीवणे इथं १५ एकर मुलकी पड जमीन आहे. त्यांनी ती जमीन आपला पुतण्या सर्जेराव पोवार यास कसण्यासाठी दिली होती. परंतु इंदुबाई पोवार यांनी हि जमीन २०१४ साली विश्वास शामराव पाटील पत्रकार यांना करार पद्धतीने खरेदी दिली होती. परंतु सदरची जमीन खरेदी अथवा विकत येत नाही. याची माहिती सर्जेराव यांना समजली, आणि यातूनच वादावादी ला सुरुवात झाली. सदरची जमीन खरेदी अथवा विकता येत नसतानाही महसूल दप्तरी ७/१२ पत्रकी विश्वास पाटील यांचे नाव आल्याने ,यावर सर्जेराव यांनी हरकत घेतली. आणि विश्वास पाटील यांचे नाव ७/१२ पत्रकावरून कमी करून घेतले. यामुळे सर्जेराव व विश्वास यांच्यात वाद सुरु झाले. आणि या वादाचे पर्यावसान अखेर रविवार दि. १३ ऑगस्ट रोजी सर्जेराव पोवार याना जबर मारहाण करण्यात झाले. विश्वास पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या सहाय्याने सर्जेराव पोवार यास जबरदस्तीने वाहनात घालून पारीवणे येथून शाहुवाडी कडे अपहरण करून आणले. या दरम्यान प्रवासात सर्जेराव यांना जबर मारहाण करण्यात आली.आणि शाहुवाडी इथं जखमी अवस्थेत सोडले. दरम्यान सर्जेराव यांच्या घरच्या लोकांनी शाहुवाडी पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. सर्जेराव यांची तिथे वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान सर्जेराव गणपती पोवार यांना मारहाण करणारे पत्रकार विश्वास शामराव पाटील, प्रकाश लक्ष्मण चोरगे, इंदुबाई यशवंत पोवार, लक्ष्मण दाजी चोरगे, अंकुश लक्ष्मण चोरगे, दीपक लक्ष्मण कांबळे, आनंदा विठ्ठल पाटील, बबन शंकर माताडे, नारायण जनार्धन पोवार या ९ तसेच अन्य अज्ञात ४ जणांवर मिळून एकूण १३ जणांवर शाहुवाडी पोलिसात अॅट्रॉसिटी, नागरी हक्क संरक्षण कायदा,तसेच ३६३,१४३, १४७, १४८, १४९, ४५२, ४२७, ३२४, ३२३, ५०४ कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर घटनेचा तपास पोलीस उपाधीक्षक आर.आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल गाडे व पोलीस कर्मचारी करीत आहेत.