धरणग्रस्त व अभयारण्य ग्रस्तांच्या मागण्या पूर्ण करा- श्री. सत्यजित देशमुख

शिराळा प्रतिनिधी : वारणा धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांची शासनाने सोडवणूक करून धरणग्रस्त व अभयाराण्यग्रस्तांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी केली.
मांगले तालुका शिराळा येथील नांदोली वसाहत व हादरेवाडी वसाहतमधील वारणा धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्त यांच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी जिल्हापुनर्वसन अधिकारी स्मिता कुलकर्णी यांच्याशी झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी बैठकी दरम्यान वारणा धरणग्रस्तांचे व अभयारण्यग्रस्तांच्या संकलन रजिस्टर मधील त्रुटी दूर करणेबाबत सविस्तर चर्चा झाली. तसेच पुनर्वसन झालेल्या गावातील उपलब्ध असलेल्या जमिनीची व खातेदाराने केलेल्या मागणीनुसार त्यांची पूर्तता लवकरात लवकर व्हावी. त्याचबरोबर ज्या खातेदारांना जमिनी मिळालेल्या आहेत.परंतु त्या जमिनी प्रत्यक्ष ताब्यात मिळालेल्या नाहीत. त्याबाबतीत तातडीने कार्यवाही करून, जमिनी धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्तांच्या ताब्यात मिळाव्यात. ज्या खातेदारांना व भूमिहीनांना भूखंड मिळालेला नाही.अशा लोकांना भूखंड देण्याचे आदेश शासनाने त्वरित द्यावेत. तसेच २०१५ नंतर ज्या खातेदारांना ज्या जमिनी मिळालेल्या आहेत. त्या खातेदारांच्या नावे सात बारा व फेरफार सदरी नोंद व्हावी. अशा विविध मागण्या यावेळी पुनर्वसन विभागाकडे करण्यात आल्या.
यावेळी पुनर्वसन अधिकारी स्मिता कुलकर्णी म्हणाल्या कि, पुनर्वसित लोकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न सुरु आहेत. याबाबत शासन स्तरावरून देखील योग्य आदेश मिळाले असून ,येत्या काही दिवसात प्रकल्पग्रस्त व अभयारण्यग्रस्तांचे बहुतांशी प्रश्न मार्गी लागतील. यासाठी मी स्वतः पुढील आठवड्यात पुनर्वसित वसाहतींना भेटी देवून प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करेन.
यावेळी मांगले गावचे उपसरपंच धनाजी नरुटे, अधिक चारापले, अशोक पाटील, ईश्वर पाटील , अरविंद पाटील, नामदेव पाटील, बाळू जाधव, ज्ञानदेव पाटील, दाजी सराफदार, देवजी वाकटे, राम महाडिक, निवृत्ती पाटील, शिवाजी मोरे, उमेश मस्कर, तुकाराम फणसे आदी उपस्थित होते.

0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!