आजही संजयदादांचे निष्ठावंत आहेत…

बांबवडे : शाहूवाडी तालुक्यातील कॉंग्रेस म्हणजेच संजयदादा गट,हे समीकरण आत्ता जिल्हा कॉंग्रेस ला समजले आहे. नुकत्याच झालेल्या कॉंग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यावरून हे समजले. ह्या मेळाव्यास उपस्थित असलेले सर्वच कार्यकर्ते स्व.आमदार संजयदादा यांच्यावर जीवापाड प्रेम करणारे कार्यकर्ते म्हणून पुन्हा एकदा एकत्र आले,आणि पुन्हा एकदा संजयदादा यांच्या नावाचा जयघोष झाला. हे वातावरण गटाला नवचैतन्य देणारं ठरलं. हे जरी खर असलं, तरी कॉंग्रेस फक्त त्यांच्या राजकीय स्वार्थासाठीच या गटाला वापरून घेणार का, कि खऱ्या अर्थाने या गटाला नवसंजीवनी देणार ,हे पाहणं कुतुहलाचे ठरणार आहे. कारण कॉंग्रेस चे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी जाहीर शब्द दिला आहे, कि यापुढे या गटासाठी आवाडे सर्वोतोपरी सहकार्य करणार.

हे वक्तव्य टाळ्या वाजवण्यासाठी ठीक आहे. परंतु गेल्या १५ वर्षात हा गट पिचला आहे. या गटाच्या नेतृत्वाला पक्षाने कुठे मानाचे स्थान दिलेले दिसत नाही. त्याचबरोबर उमेदवार निवडणुकीत हरला,म्हणजे त्याच्याशी संबंध संपला,असेही होत नाही. अशावेळी अशा उमेदवाराचे खच्चीकरण होवू नये,म्हणून पक्षाने त्यांचे पुनर्वसन करायला हवे,हि त्यांची नैतिक जबाबदारी आहे.

दादा हयात असताना त्यांनी तालुक्यात धरणे बांधलीत. आज त्या धरणाचे पाणी शेतकऱ्याच्या बांधापर्यंत अजूनही पोहचले गेलेले नाही. उलट याच धरणावर विद्युत निर्मिती प्रकल्प उभारले गेले,आणि खाजगीरीत्या वापरले सुद्धा जावू लागले. बरे हे खाजगी विद्युत प्रकल्प इथल्याच लोकांनी जमिनी दिल्यानंतर, धरण बांधलं गेल्यामुळे सुरु झाले आहेत. या जमिनी सुद्धा इथल्या शेतकऱ्याकडून अगदी जुजबी दराने घेतल्या गेल्या आहेत, तेही दादांच्या प्रेमाखातर. यातून शासनाने उतराई म्हणून तिथल्या लोकांना वीज मोफत वापरायला द्यायला काय हरकत आहे. किंवा तालुक्यातील शासकीय ग्रामीण नळ पाणी पुरवठा योजनांना हि वीज जर मोफत दिली, तर वीजबिले थकीत असलेल्या ग्रामपंचायतींना दिलासा मिळेल,आणि लोकांची पाण्याची गरज आपोआप पूर्ण होईल. त्यामुळे ग्रामपंचायती वरचा वीजबिलाचा बोजादेखील वाढणार नाही. जे संजादादांनी खेडूत समाजाच्या भवितव्याच्या दृष्टीने धरणे बांधली,त्यांचा उद्देश निश्चित सफल होईल. यात फक्त संजयदादा गटाचीच लोक पाणी पिणार नसून संपूर्ण तालुक्याच पाण्याच दुर्भिक्ष दूर होईल. उर्वरित वीज खाजगी मालकांनी वापरावी याबाबत कोणाचाच आक्षेप राहणार नाही. याबाबत आवाडे साहेब विचार करणार का ? असो.

दरम्यान या मेळाव्याने संजयदादा गट निश्चितच जागा झाला आहे. प्रत्येकाला आजही संजयदादा यांची तितकीच आठवण येते,हे सत्य कोणी नाकारू शकत नाही. जे गेले,ते गेले ,पण आजही संजयदादा यांना मानणारा निष्ठावंत कार्यकर्ता शिल्लक आहे. हेच या मेळाव्यावरून दिसून आले.

4+
4+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: