हातकणंगले लोकसभा मतदारसंघात “ शेट्टींची बॅट चालणार कि मानेंच्या धनुष्यातून बाण सुटणार ”

बांबवडे :हातकणंगले लोकसभा मतदारसंघ, कोल्हापूर जिल्ह्यातील संवेदनशील मतदारसंघ असून, ह्या मतदारसंघाच्या यशामध्ये शाहूवाडी तालुक्याचे मोलाचे योगदान आहे. नुकत्याच झालेल्या मतदान प्रक्रियेतील  दोन महत्वाचे उमेदवार म्हणजे खासदार राजू शेट्टी आणि धैर्यशील माने हे होत. परंतु बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार हाजी अस्लम सय्यद यांची सुद्धा दखल घेणे क्रमप्राप्त ठरणार आहे. त्यामुळे शाहूवाडी तालुक्याचे योगदान कुणाच्या पदरात पडणार हे महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे या मतदारसंघात शेट्टींची बॅट चालणार कि, मानेंच्या धनुष्यातून बाण सुटणार याची चर्चा तालुक्यात सुरु आहे.

खासदार राजू शेट्टी यांनी मागील लोकसभा पंचवार्षिक मध्ये भाजपशी सोबत केली होती.पण शेवटच्या वर्षात त्यांनी भाजप शी काडीमोड घेतली. निवडणुकीच्या अगोदर कॉंग्रेस ,राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या माध्यमातून ते लोकसभा निवडणुकीस सामोरे गेले. परंतु या अगोदर याच मंडळींच्या विरोधात शेट्टी यांनी शंख ध्वनी गेल्या चार वर्षात केला होता. आणि आज त्यांच्याच सोबत उभे राहून शेतकऱ्यांची पाठराखण करण्याचा दावा केला आहे. कारखानदार बहुतांश कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्याकडे आहेत. गेली अनेक वर्षे कारखानदारांना विरोध करणाऱ्या शेट्टी यांना एवढी कशाची गरज भासली कि,त्यांनी कॉंग्रेस आघाडीच्या पडवीचा आश्रय घेतला. हि युती करताना त्यांनी शेतकऱ्यांशी विचारविनिमय केला होता का ? आजपर्यंत ज्यांना विरोध केला,आज त्यांच्या सोबत उभे राहताना शेतकरी खऱ्या मनापासून त्यांच्या पाठीशी उभा होता,असे कधी जाणवले नाही. याचा परिणाम शेट्टी यांच्या मतांवर होणार का? हि बाब विचार करण्यासारखी आहे. त्याचबरोबर बहुजन वंचित आघाडी निश्चित शेट्टी यांच्या मतांवर परिणाम करणार आहे. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांची तयार झालेली जनमानसातील प्रतिमा,हा फॅक्टर सुद्धा विसरून चालणार नाही. दरम्यान शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने हे एक उत्तम वक्ता, अभ्यासू नेतृत्व असून,त्यांना शिवसेनेच्या विद्यमान आमदारांची साथ मिळाली आहे. चार आमदार आणि नवीन उमेदवार निश्चितच जनतेला भावणार आहे. त्यांनी मांडलेले प्रश्न,हे सर्वसमावेशक असून केवळ शेतकरी नव्हे, तर शेतकऱ्यांसहित सामान्य जनता डोळ्यासमोर ठेवून त्यांनी प्रचार केला आहे. त्याचबरोबर ते स्व. बाळासाहेब माने यांचे नातू तर माजी खासदार निवेदिता माने यांचे चिरंजीव आहेत. तेंव्हा त्यांना दुर्लक्षून चालणार नाही. आजपर्यंत कुणीही बरोबर नसताना एक व्होट आणि एक नोट या प्रणालीवर शाहूवाडी च्या जनतेने राजू शेट्टी यांना बहुमत मिळवून दिले असतानाही,हातकणंगले त्यांनी केलेली युती कशासाठी ? हा सर्वसामान्यांचा प्रश्न आहे. दरम्यान दुसरे उमेदवार राजू शेट्टी यांनी प्रचाराच्या शेवटच्या काळात केलेला शिट्टी चिन्हाचा प्रचार देखील खासदार शेट्टी यांना मारक ठरू शकतो.

यामुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शाहूवाडी तालुका कोणाच्या पदरात झुकते माप टाकतो, यावरून या मतदारसंघाचा खासदार ठरणार हे येत्या २३ मे ला आपणास दिसून येईल.

2+
2+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: