जि.प. शाळांमध्ये पुनर्प्रवेश विद्यार्थांचा वाढता किलबिलाट: जि.प.शाळाच लय भारी

बांबवडे : एकीकडे खाजगी शाळांचे पेव वाढत असताना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जाही वाढताना दिसत आहे. गेल्या दोन दशकात इंग्रजी शाळांचे फॅड वाढले होते. त्यांच्या आकर्षक जाहिरातींना पालक वर्ग फसू लागला. परंतु शासनाच्या “ गाव तिथे शाळा ”, कायमस्वरूपी विनाअनुदान तत्वावरील शाळा, अशा काही धोरणांमुळे गावोगावी , शहरातील गल्लोगल्ली अशा खाजगी शाळांचे पेव फुटले. “ सैनिकी पॅटर्न शाळा ”,CBSE  अभ्यासक्रम,SBSE अभ्यासक्रम, अशा आकर्षक शिर्षकाखाली भरमसाठ फी आकारून  लोकांना फसविण्याचा गोरखधंदा काही मंडळींनी केला. भारतीय समाजाची मानसिकता अशी आहे “जे काही विकत मिळते, ते दर्जेदार  आणि जे फुकट मिळते ते निकृष्ट ” अशी एक पक्की धारणा झाली आहे. त्यामुळे मागील काही वर्षात राज्यातील असंख्य पालकांनी या मोहाला बळी पडून जि.प.प्राथमिक शाळांकडे पाठ फिरवली ,आणि आपल्या पाल्यांना खाजगी शाळांमध्ये घातले.

मुळात शिक्षणाचा संबंध संस्कृती शी असतो. त्यामुळे सध्याची इंग्रजी शिक्षणाच्या मोहात पडलेली पिढी भारतीय संस्कृती पासून दूर जात आहे. प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच झाले पाहिजे. इंग्रजी हि ज्ञान भाषा जरूर आहे, पण त्यामुळे इतर सर्व विषयातील मुलभूत संकल्पना , संबोध कच्चे रहातात त्याचे काय ? इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या या मुलांना देश, धर्म, संस्कृती यांच्याशी आस्था च राहिली नाही. अशीच मुले भविष्यात परदेशात नोकरीसाठी जातात, आणि तिथेच रहातात. आपली हि पिढी देशापासून निश्चितच दुरावत आहे. पैसे कमविण्यासाठी परदेशी जाणं, यात गैर काही नसलं, तरी तिथेच राहाणं हा देशाचा फार मोठा तोटा आहे. बरं दुसरी गोष्ट म्हणजे असे विद्यार्थी “ ना  घर का ना घाट का ” अशीच होतात. इंटरनॅशनल स्कूल, CBSE  अभ्यासक्रम, SBSE अभ्यासक्रम, येथील शिक्षक किती प्रशिक्षित आहेत याचा विचार करताना पालक दिसत नाहीत, किंबहुना  त्यांना त्याची गरज वाटत नसल्याचे भासते. परंतु यामुळे देशाची एक पिढी बरबाद होण्याच्या मार्गावर जातेय, असे वाटत असतानाच, पुन्हा एकदा आशा पल्लवित होवू लागल्या आहेत. मागील दोन वर्षात पालकांना या चुकीची जाणीव झाल्याची दिसू लागली आहे. कारण जिल्हा परिषद शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओघ वाढू लागला आहे. असे चित्र दिसू  लागले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या “ प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र ” हे धोरण आणि १४ व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींमधून शाळांना मिळणाऱ्या २५% थेट निधीमुळे जि.प.शाळांचे रूप बदलू लागले आहे. शाळा डिजिटल होवू लागल्या आहेत. सुसज्ज प्रयोगशाळा, ग्रंथालय, क्रीडांगण, तज्ञ व प्रशिक्षित शिक्षक वर्ग आणि भौतिक सुविधांनी परिपूर्ण अशा शाळा बनू लागल्या आहेत. परिणामी जि.प. शाळांमध्ये पुन्हा एकदा मोठा किलबिलाट होताना दिसू लागला आहे. शैक्षणिक वर्षात महाराष्ट्रात इतर माध्यमाच्या शाळांमधून २५००० च्यावर विद्यार्थ्यांचा जि.प. शाळांमध्ये पुनर्प्रवेश झाला आहे. हे चित्र नक्कीच उत्साहवर्धक आहे. नेहमीप्रमाणे कोल्हापूर यातही आघाडीवर आहे.

वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये चमकणारे विद्यार्थी बहुतांश जि.प. शाळांमध्येच शिकलेले दिसतात. शिष्यवृत्ती, नवोदय, प्रज्ञाशोध परीक्षा, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात जि.प. शाळांच्या विद्यार्थ्यांचाच वरचष्मा आहे. त्यामुळे जि.प. शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा वाढता प्रवेश निश्चितच समाधानकारक आहे.यामुळे आपली जि,प. शाळाच लय भारी असं म्हटल्यास अतिशयोक्ती होवू नये.

श्री संजय स. पाटील ( पिशवीकर )

0
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: