दिव्यांगांच्या पाठीशी “माणुसकीची भिंत, वणवामुक्त शाहूवाडी ” :शाहूवाडी पंचायत समिती

शाहूवाडी : दिव्यांगांना उपचार कक्ष निर्माण करून देण्यासाठी गटविकास अधिकारी अनिल वाघमारे यांच्यासह सर्व पंचायत समिती पदाधिकारी व सदस्य यांनी तयारी दर्शविली असून तालुक्यातील दिव्यांगांना तालुक्यातच उपचार मिळतील,यासाठी कार्यवाही करण्यास पंचायत समितीने मंजुरी दिली आहे. यातून या अधिकारी आणि पदाधिकारी यांनी माणुसकीची भिंत दिव्यांगांच्या पाठीशी समर्थपणे उभी केली आहे. त्याचबरोबर “ वणवा मुक्त शाहूवाडी ” हि अभिनव योजना तालुक्यात राबविण्यात येणार आहे.

“ शाहूवाडी पंचायत समिती ” ची मासिक सभा समिती च्या सभागृहात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती सौ.अश्विनी पाटील होत्या, तर सचिव म्हणून गट विकास अधिकारी अनिल वाघमारे यांनी काम पाहिले.

यावेळी सर्वाधिक चर्चा बांधकाम विभागावर झाली. कडवे येथील आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीच्या सभोवताली उकरून त्यातील माती इतरत्र वापरण्यात आली आहे. त्यामुळे इथं निर्माण झालेल्या खड्ड्यात पसल्यातील पावसाचे पाणी साचून कुणी लहान मुल पडल्यास दुर्घटना घडू शकते,असा आरोप पंचायत समिती सदस्य विजय खोत यांनी केला. सदरच्या कामाची चौकशी झाली पाहिजे व संबंधितांवर फौजदारी व्हावी,अशीही मागणी विजय खोत व अमरसिंह खोत यांनी केली. एका गावात तीन लोकप्रतिनिधी असतानाही अधिकारी अशाप्रकारचे धाडस कसे काय करू शकतात ? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. सादर कामाचे कोणतेही टेंडर काढण्यात आले नव्हते,तरीही धाडसाने केलेल्या कामाचे सभागृहाने आश्चर्य व्यक्त केले.

दरम्यान खड्डे भरण्याचे काम कुठे कुठे झाले आहे,असा प्रश्न विचारताच महामार्गालगत असणाऱ्या गावांकडेच काही कामे झालीत,तर दुर्गम भाग अजूनही रस्त्यांच्या प्रतीक्षेत आहे,असे विजय खोत यांनी सांगितले.

दरम्यान जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी उबाळे मॅडम यांनी मासिक सभेस उपस्थिती दर्शविली. यावेळी पंचायत समिती च्यावतीने सभापती अश्विनी पाटील यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी माजी सभापती सौ स्नेहा जाधव यांनी रिक्त शिक्षक पदांच्या भरती बाबत प्रश्न उपस्थित केला असता, यापुढे नवीन येणाऱ्या शिक्षकांना शाहूवाडी इथं काम करण्याच्या अटीवरच घेण्यात येईल, असे आश्वासन उबाळे यांनी दिले. दरम्यान नांदगाव येथील शाळा इमारतीचे निर्लेखन करण्यात यावे, असाही मुद्दा जाधव यांनी मांडला.

अमरसिंह खोत यांनी करुंगळे-कडवे एसटी का बंद करण्यात आली, असा प्रश्न उपस्थित केला असता, एसटी च्या अधिकाऱ्यांनी लवकरच एसटी सुरु करण्यात येईल,असे सांगितले. त्याचबरोबर सावर्डे-मोळावडे एसटी देखील सुरु करण्यात येईल ,असे सांगितले.

यावेळी माजी उपसभापती दिलीप पाटील यांनी बांधकाम विभागाचे कर्मचारी कार्यालयातच उपस्थित नसतात,असा आरोप केला आहे. असे असतानाही संबंधितांचा पगार कसा काय काढला जातो, याची चौकशी व्हावी, अशी मागणी केली.

दरम्यान सामाजिक वनीकरण चे अधिकारी व कर्मचारी चर मारणे, वृक्ष लागवड किंवा अन्य कोणत्याही कामाची निविदा न काढताच स्वत:च कामे करतात, याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विजय खोत यांनी केली.

तसेच कडवे येथील शाळेच्या पटांगणातील झाडे कोणाचीही परवानगी न घेता तोडली गेली आहेत. तसेच याबाबतही कोणतीही निविदा काढण्यात आलेली नाही.

दरम्यान शाहूवाडी तालुका “ वणवा मुक्त तालुका ” करण्याची मोहीम राबवण्यात यावी,असे गट विकास अधिकारी अनिल वाघमारे यांनी सांगितले. या अभियानात सर्व पदाधिकारी, ग्रामपंचायत, सरपंच, ग्रामसेवक व ग्रामस्थ यांनी सहभाग घ्यावा. तसेच या मोहिमेबाबत तज्ञ मंडळींची मार्गदर्शन पर शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये कृषी विभागाने देखील सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर  गेल्याच महिन्यात झालेल्या दिव्यांग शिबिरामध्ये तालुक्यातील दिव्यांगांची संख्या अधिक आहे.

त्यांना उपचार तालुक्यातच मिळावे,यासाठी त्यांना कक्ष उपलब्ध करून देण्याची कार्यवाही लवकरच सुरु करण्यात येईल. असेही गट विकास अधिकारी वाघमारे यांनी सांगितले.

यावेळी आभार सभापती सौ अश्विनी पाटील यांनी मानले.

0
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: