जवान दीपक शेवाळे यांचे हृदयविकाराने निधन : रक्षाविसर्जन दि.९ जून रोजी

भेडसगाव/प्रतिनिधी ( मारुती फाळके ):

भेडसगाव ता.शाहूवाडी येथील, सी.आर.पी.एफ. चे जवान दीपक ज्ञानदेव शेवाळे {वय 48} यांचे गडचिरोली येथे सेवा बजावत असताना, गुरुवार दि.६ जून रोजी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 1993 पासून ते सीआरपीएफ युनिट क्र.१९१मध्ये सेवा बजावत होते, आज (शनिवारी) दुपारी त्यांचे पार्थिव मूळ गावी भेडसगाव (ता शाहूवाडी) येथे आणण्यात आले. वीर जवान अमर रहे,वीर जवान तुझे सलाम अशा जयघोषात गावातून पार्थिवाची अंत्ययात्रा  काढण्यात आली.

याबाबत ची अधिक माहिती अशी कि, दीपक सेवा बजावत असलेल्या एफ १९१ ही ८० जणांची तुकडी गडचिरोली नक्षलवादी क्षेत्रातुन जंगलातून चालत माघारी येत होती. यावेळी वडसा गावच्या हद्दीत आल्यावर दीपक यांच्या छातीत कळ येऊ लागली, याची कल्पना त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना दिली. त्यांनी ताबडतोब रुग्णवाहिकेला पाचारण करून, अहिरे या तालुक्याच्या ठिकाणी केंद्रीय राखीव दलाच्या दवाखान्यात दाखल केले. इथे उपचाराला दीपक प्रतिसाद देत नसल्याने इथल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना चंद्रपूर येथील जिल्हा शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. दीपक यांचे निधन झाल्याची बातमी सी. आर. पी. एफ. च्या प्रशासनाने ताबडतोब घरच्यांना दिली.

दुपारी १.३० च्या सुमारास दीपक यांचे पार्थिव खाजगी गाडीतून गावात आणण्यात आले. तत्पूर्वी अंत्यसंस्कार शासकीय इतमामात की घरगुती पद्धतीने करायचे याबाबत संदिग्धता होती. याची प्रशासनाने कोणतीही कल्पना दिली नव्हती. शेवटी कदम व शेवाळे भावकीने स्वतः अंत्यसंस्काराची तयारी केली. बंद पेटीतले दीपक यांचे पार्थिव खाली उतरताच दिपकची पत्नी, आई व मुलीने एकच हंबरडा फोडला. गावातील महिलांनी पार्थिव पाहताच, अश्रूंना वाट मोकळी करून दिली. यावेळी पंचक्रोशीतील आबालवृद्धासंह सर्वानी अंत्यदर्शनासाठी खूप गर्दी केली होती.

दीपक शेवाळे हे सन  १९९३ साली केंद्रीय राखीव पोलीस दलात भरती झाले. लहानपनापासून ते जिद्दी व हुशार होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण केंद्रशाळा भेडसगाव तर माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल येथे झाले. ३ महिन्यापूर्वी दीपक हे कुटुंबासमवेत गावी सुट्टीवर आले होते. तेव्हा त्यांनी कंदलगाव ता.करवीर येथे नवीन घर खरेदी केले होते. त्या घराची वास्तुशांती या महिन्यात सुट्टीवर आल्यावर घालणार होते. हे त्यांचे स्वप्न अपुरे राहिले. दीपक यांच्या निधनाची वार्ता समजताच गावातील व आठवडी बाजार व सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. ग्रामस्थांनी सजवलेल्या ट्रॅक्टर मधून, गावातून त्यांचे व्यर्थ न हो बलिदान, अमर रहे अमर रहे, दीपक जवान अमर रहे अशा निनादात अंत्ययात्रा काढली. या अंत्ययात्रेत गावातील ग्रामस्थ, युवक, महिला, लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते. गावातील अंत्ययात्रेनंतर पार्थिव आनंद माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आणण्यात आले. सुरुवातीला शाहुवाडीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भालचंद्र देशमुख यांच्या नियोजनाखाली पोलिसांची मानवंदना व बंदुकीच्या फैरी झाडून अभिवादन करण्यात आले. यावेळी वाजवण्यात आलेल्या ट्रम्पेट च्या धून मुळे वातावरण खूपच भावनिक झाले. यावेळी उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा ओलांवल्या. यानंतर मुलगा पार्थने दीपक यांच्या पार्थिवाला भडाग्नी दिला.

 दीपक यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा पार्थ (१० वर्ष),मुलगी-प्रियांका१८ वर्ष, भावजय, पुतणे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या दि.९ जून रोजी आहे.

    अंत्यसंस्कारा वेळी शाहुवाडीचे आमदार सत्यजित पाटील, जि. प. सदस्य हंबीरराव पाटील, अमर पाटील, पंचायत समिती सभापती अश्विनी पाटील, सदस्य दिलीप पाटील, विजय खोत, डॉ.स्नेहा जाधव, सरपंच अमरसिंह पाटील, नियोजन समिती सदस्य प्रवीण प्रभावळकर, भाजपचे तालुकाध्यक्ष दाजी चौगुले, दत्ता पोवार, अलका भालेकर, सर्जेराव पाटील माणकर, आप्पासो साळुंखे, बाळासाहेब पाटील व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. 

जवान दीपक शेवाळे यांना SPS न्यूज आणि सा.शाहुवाडी टाईम्स च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली .

1+
1+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: