संजयदादांच्या स्वप्नातील विकास पर्व साकार करू- डॉ.विनयरावजी कोरे

बांबवडे : स्वत:साठी कसलीही अपेक्षा न ठेवता जनतेच्या भल्यासाठी कोणतंही सहकार्य करण्याची भूमिका ठेवणारे व्यक्तिमत्व, म्हणजे कर्णसिंह गायकवाड होय. मनाच्या अनेक कोपऱ्यात पराभवाच्या जखमा भळभळत वहात असतानाही, त्याच्या वेदना चेहऱ्यावर न दाखविता, सदा हसतमुख चेहरा ठेवणारं हे व्यक्तिमत्व भविष्यात यशस्वी झाल्याशिवाय रहाणार नाही. त्यांच्या आजच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उदंड आयुष्य लाभो, हीच ज्योतिर्लिंगाच्या चरणी प्रार्थना आहे. असे मत माजी मंत्री डॉ. विनयरावजी कोरे यांनी व्यक्त केले.

९ सप्टेंबर हा दिवस म्हणजे कर्णसिंह गायकवाड यांचा वाढदिवस. या दिवशी प्रति वर्षी वाढदिवस समारंभ साध्या पद्धतीने साजरा केला जातो. परंतु नुकतेच कर्णसिंह गायकवाड यांची महाराष्ट्र राज्याच्या यंत्रमाग महामंडळाच्या उपाध्यक्ष पदी निवड झाली. त्याचबरोबर वस्त्रोद्योग महामंडळाच्या उपाध्यक्ष पदी समित कदम यांची सुद्धा निवड झाली आहे. कर्णसिंह यांना मिळालेले राज्याचे पद आणि आज ९ सप्टेंबर रोजी साजरा होणारा त्यांचा वाढदिवस हा दुग्धशर्करा योग आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राधेश्याम मंगल कार्यालाय ठमकेवाडी इथं हा नागरी सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जनसुराज्य शक्ती पक्षाचे सर्वेसर्वा डॉ. विनयरावजी कोरे हे होते. ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

ते पुढे म्हणाले कि, वस्त्रोद्योग आणि यंत्रमाग या क्षेत्रात रोजगाराची संधी आहे. त्याचबरोबर शासनाकडून या उद्योगाला भरीव अनुदान सुद्धा देण्यात येते. तेंव्हा या पदाचा जनतेच्या संसाराच्या अर्थकारण सुधारण्यासाठी  वापर करावा, असे डॉ. कोरे यांनी सांगितले. याही अगोदर शाहूवाडी तालुक्यातील जनतेसाठी हरितक्रांती ची स्वप्ने पाहणारे द्रष्टे नेते स्व.आम.संजयसिंह गायकवाड हे होते. महाराष्ट्राच्या पाण्याचे नियोजन करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. कृष्णा खोरे विकास मंडळाच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातून जाणारे पाणी शाहूवाडी तालुक्यासाठी अडवले. आणि इथल्या सामान्य जनतेला हरितक्रांती चे वरदान देणारे ते एक कर्मयोगी होते. त्या महान व्यक्तीने शाहूवाडीतील बॉक्साईट तालुक्यात राहण्यासाठी एक संस्था काढली होती. ती संस्था त्यांच्याकडून काढून घेण्यासाठी नामदेवराव खोत यांनी गळ घातली, आणि आम्ही त्यांना मदत हि केली, हि आमची चूक होती, हे आम्हाला उशिरा कळले. राजकारणात अनेकवेळा पराभव पचवणे सोपे नसते.तरीही कर्णसिंह गायकवाड आपल्या वडिलांनी दिलेला वसा आणि वारसा राखण्यासाठी न डगमगता उभे राहिले. त्यांचे करावे तितके कौतुक थोडेच आहे. त्यांच्याकडे आमच्या अगोदर देखील गोकुळ देवू, तसेच अनेक प्रस्ताव त्यांच्याकडे आले होते. परंतु ते शब्दाला पक्के आहेत, म्हणून ते स्वीकारले नाहीत. परंतु गोकुळ कर्णसिंह यांना देणारे हे कोण? त्यांना काय अधिकार? तेंव्हा अनेक भूल थापा देणाऱ्यांपासून सावध असा. कर्णसिंह यांच्या मनातील समाजविकासाचे पर्व आपण निश्चित साकार करू, असेही डॉ. कोरे यांनी सांगितले.

यावेळी राज्याचे यंत्रमाग महामंडळाचे नूतन उपाध्यक्ष कर्णसिंह गायकवाड यांनी सत्कार सोहळ्याला उत्तर देताना सांगितले कि, कोरेसाहेबांनी केलेल्या उपकाराची परतफेड या जनसमुदायाच्या सहकार्याने केल्याशिवाय हा कर्णसिंह राहणार नाही. महाभारतातील कर्णाला देखील अनेकवेळा अपमानाला सामोरे जावे लागले होते. आणि मलाही पराभवाच्या अनेक जखमांना सामोरे जावे लागले आहे. परंतु महाभारतातील कर्ण सुद्धा खरा योद्धा होता, आणि आम्हीसुद्धा लढल्याशिवाय राहणार नाही. मी येथील प्रत्येक कार्यकर्ता माझ्या घरातील सदस्य असल्याचे मानत आहे. मला आपण सर्वांनी आजपर्यंत भरपूर प्रेम दिले आहे, इथून पुढेसुद्धा आपल्या प्रेमाचा मी भुकेला असणार आहे. आपण सर्वांनी केलेल्या सत्काराबाबत आपल्या सर्वांचे आभार. त्याचबरोबर ज्यांनी या पदापर्यंत आम्हाला नेले असे जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते डॉ. विनयरावजी कोरे याचे सुद्धा शतश: आभार, असे कर्णसिंह यांनी मानले.

यावेळी जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समिती चे सभापती सर्जेराव पाटील पेरीडकर म्हणाले कि, विद्यमान आमदारांना घरात बसवल्याशिवाय तालुक्याचा विकास होणार नाही. आमदार सत्यजित पाटील यांच्यावर टीका करताना, ते म्हणाले कि, ज्यांना सभासद गोळा करण्यासाठी साधं गुऱ्हाळ काढता आलं नाही, त्यांनी स्वत:ला कार्यसम्राट म्हणवून घेवू नये. चरण येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी विकास कामांच्या बाबत एका व्यासपीठावर येण्याचे आव्हान केले होते, त्यांना आमचे समाज कल्याण सभापती विशांत महापुरे यांच्या विकासकामांची यादीच पुरेशी आहे. केवळ लग्नाला जाणे, आणि सांत्वनाला जाण्यापलीकडे काय केले, असा प्रश्न आहे. केवळ आपल्या भावाला कंत्राटदार बनवणाऱ्या आमदारांनी आम्ही ठरवलेल्या कामांची उद्घाटने केलीत. तसेच केवळ कागदावर असणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या योजनांची उद्घाटने करून कोणी कार्यसम्राट होत नाही. यांनी सत्तेवर असताना एवढेच केले,पण सत्तेवर नसतानाही डॉ. विनयरावजी कोरे यांनी विकासकामांचा धडाका लावला आहे. असेही सर्जेराव पेरीडकर यांनी सांगितले.

यावेळी जि.प.सदस्य शिवाजीराव मोरे यांनी आपल्या मनोगतातून आमदार सत्यजित पाटील यांच्यावर टीका करताना म्हणाले कि,एका व्यासपीठावर येण्याचे आव्हान करणाऱ्यांनी आम्ही जि.प.सदस्य व सभापती यांच्या विकासकामांएवढी तरी कामे करावीत. आम्ही कधीही यायला तयार आहोत.

 सर्व सामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून केलेल्या विकास कामांमुळेच सावकार साहेबांना डॉक्टरेट हि पदवी मिळाली आहे. वस्त्रोद्योग व यंत्रमाग यांच्या माध्यमातून मतदारसंघात निश्चितच रोजगाराची नवी पहाट होणार आहे.

यावेळी स्वागत व प्रास्ताविक सुभाषराव इनामदार यांनी केले. महादेवराव पाटील साळशीकर, पंडितराव नलवडे, सखाराम गाडे, शिवाजीराव मोरे, सर्जेराव पाटील पेरीडकर, अमरसिंह खोत, कृष्णा पाटील आदींनी मनोगते व्यक्त केलीत. तर आभार बाळासाहेब गद्रे यांनी मानले.

यावेळी शाहूवाडी व पन्हाळा तालुक्यातील संजयदादांवर व कर्णसिंह यांच्यावर प्रेम करणारी जनता त्याचबरोबर जनसुराज्य शक्ती पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी व्यासपीठावर माजी आमदार संजीवानिदेवी गायकवाड, माजी महिला बाल कल्याण सभापती भाग्यश्रीदेवी गायकवाड, वस्त्रोद्योग महामंडळाचे नूतन उपाध्यक्ष समित कदम, बाजारसमिती चे अध्यक्ष बाबा लाड, दादासो बारगीर, भीमराव पाटील आप्पा सरुडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

1+
1+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: