शाहूवाडी मतदारसंघात दुरंगी काटा लढत अपेक्षित

शाहूवाडी : शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघात काटा लढत होणार असून, प्रमुख लढत शिवसेनेचे विद्यमान आमदार सत्यजित पाटील व जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक विनय कोरे यांच्यात होणार असल्याचे दिसत आहे.

एकंदरीत विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, व्यासपीठावरून टिकांचे आणि प्रश्न विचारण्याचे तोफगोळे सुटू लागले आहेत. प्रत्येकजण आपण काय केले, हे सांगत असताना विरोधकांनी काय नाही केले, हे सांगण्यावर भर दिला आहे. नेहमी शांत स्वभावात वक्तव्य करणारे माजी मंत्री विनय कोरे यांनी सुद्धा शाब्दिक तोफांचा भडीमार केला. आणि विद्यमान आमदारांच्या वडिलांनी एकेकाळी शिवसेनेला कसा दगा दिला, हे सांगायला ते विसरले नाहीत. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला होता, याचे ते परिणाम असावेत. याचबरोबर श्री कोरे यांनी गतवेळच्यापेक्षा यंदाची प्रचार यंत्रणा वेगळ्या पद्धतीने राबविली आहे. सर्वसामान्य जनतेला थेट भेटण्यावर त्यांचा भर अधिक असल्याचे जाणवत आहे.

दुसरीकडे शिवसेनेचे विद्यमान आमदार श्री सत्यजित पाटील, आपल्या मोजक्या सहकाऱ्यांसोबत सल्लामसलत करीत रणनीती आखत आहेत. त्यांनी देखील थेट जनतेशी संपर्क साधण्यावर भर दिला आहे. पन्हाळा तालुक्यातून अधिक मते कशी मिळतील, यावर त्यांचा जोर असल्याचे जाणवत आहे. याचबरोबर बाहेरील मतदान कसे होईल, याकडेही त्यांचे लक्ष आहे. दरम्यान शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख जयवंतराव काटकर यांना विद्यमान आमदारांनी मागील काळात दिलेली बगल हा कळीचा मुद्दा ठरू शकतो. कारण त्यांनी माजी मंत्री विनय कोरे यांना सहकार्य करण्याचे ठरवले असून, ते कामाला देखील लागले आहेत. त्यांच्यासोबत नाराज शिवसैनिकांची तुकडी असल्याने हा विषय सुद्धा बाजूला ठेवून चालणार नाही.

यावेळी शेकाप चे भाई भरत पाटील हे शेकाप च्या वतीने लढत आहेत. गतवेळी त्यांनी विद्यमान आमदार सत्यजित पाटील यांना उघड सहकार्य केले होते. परंतु यावेळी शेकाप ने शाहूवाडी त स्वतंत्र उमेदवार भाई भरत पाटील यांच्या माध्यमातून दिला असून, पन्हाळा तालुक्यात मात्र त्याच शेकाप ने सेनेच्याच चंद्रदीप नरके यांना पाठींबा दर्शविला आहे. त्यामुळे शेकाप ची भूमिका नेमकी काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान शाहूवाडी तालुक्यातील कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही महत्वाच्या  पक्षांनी शाहूवाडी मतदारसंघ रिकामाच सोडला,याचे कुतूहल सर्वसामान्य जनतेला निर्माण झाले आहे. याच पक्षांच्या नेत्यांनी परस्पर विरोधी भूमिका घेत कर्णसिंह गायकवाड यांनी विनय कोरे यांना तर मानसिंगराव गायकवाड यांनी आमदार सत्यजित पाटील यांना पाठींबा दर्शविला आहे.

एकंदरीत मागील विधानसभा निवडणुकीत आमदार पाटील यांच्या पाठीशी मानसिंगराव गायकवाड, शेकाप चे भाई भरत पाटील, त्याचबरोबर कॉंग्रेस मधील अनेक कार्यकर्त्यांनी “ शाहूवाडी च्या अस्मितेचा स्वाभिमान ” या स्लोगन खाली आमदार सत्यजित पाटील यांना पाठींबा दर्शविला होता. तसेच कॉंग्रेस च्या वतीने कर्णसिंह गायकवाड स्वतंत्र उमेदवार होते. त्याचबरोबर स्वाभिमानी पक्षाच्या वतीने अमर पाटील यांनी उमेदवारी लढविली होती. यामुळे मतांचे विघटन झाले होते. पण आत्ता मात्र चित्र बदलेलं आहे. ज्यांनी स्वतंत्र उमेदवारी लढली,  कर्णसिंह व अमर पाटील हे ताकदीचे उमेदवार जनसुराज्य चे विनय कोरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले, तर भाई भरत पाटील यांनी स्वतंत्र अर्ज दाखल केला आहे. यामुळे गतवेळच्या मानाने कोरे यांना चांगली ताकद उपलब्ध झाली आहे. पण या मंडळींच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे सहकार्य केले तर, कोरे यांना चांगला पाठींबा लाभेल. दरम्यान सत्यजित पाटील यांनी जुन्या शिवसैनिकांना विश्वासात घेवून खिंड लढवने गरजेचे आहे. यामध्ये त्यांची नवी जमेची बाजू म्हणजे खासदार धैर्यशील माने हि वक्तृत्वाची मुलुख मैदानी तोफ त्यांच्यासोबत आहे. या सगळ्यांचा योग्य वापर होणे, हि त्यांच्यादृष्टीने काळाची गरज आहे.

एकूण शाहूवाडी मतदारसंघात अस्तित्वाची काटा लढत अपेक्षित आहे.

0
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: