अथणी शुगर्स कडून १५ फेब्रुवारी पर्यंत ची ऊस बिल रक्कम अदा- श्री योगेश पाटील
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील अथणी शुगर्स ने गळीतास आलेल्या ऊस बिलाची रक्कम फक्त १५ दिवसांच्या आत अदा करून शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पाळले आहे. भविष्यात सर्व शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस पुरवठा करून ५ लाख गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री योगेश पाटील यांनी केले आहे.

येथील अथणी शुगर्स च्या वतीने यंदा सन २०२०-२१ गळीत हंगामाच्या अखेरीस आज अखेर १२१ दिवसात सरासरी साखर उतारा १२.२५ याप्रमाणे ऊसाचे गाळप ३,८८,५७२ मे.टन झाले असून, साखर उत्पादन ४,६५,९२० क्विंटल इतके झाले आहे.


दरम्यान अथणी शुगर्स कडून १५ फेब्रुवारी २०२१ अखेर गळीतास आलेल्या ऊस बिलाची प्रती टन २९००/- रु. प्रमाणे सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली असून, याशिवाय सर्व तोडणी, वाहतूक कंत्राटदार यांची बिले देखील अदा करण्यात आली आहेत. त्याचबरोबर कारखान्याने एफ.आर.पी. पेक्षा जादा ऊस दर देण्याची परंपरा कायम राखली आहे. या माध्यमातून गळीतास आलेल्या ऊसाला चांगला दर मिळाला पाहिजे,हि नामदार श्रीमंत पाटील यांची भूमिका आजही कायम राखली आहे, असेही श्री योगेश पाटील यांनी सांगितले.