…आणि ” शिक्षकांच्याच ” शाळांना दांड्या : सभापतींच्या शाळा भेटींमुळे प्रकार उघडकीस
शाहुवाडी : शाहुवाडी तालुक्यातील अनेक शाळांना शाळेच्या वेळेत कुलुपे असल्याचे, त्याचबरोबर अनेक शिक्षक विनासुचना प्रशासनाला फसवत असल्याचे, नुकतेच निदर्शनास आले आहे. शाहुवाडी पंचायत समितीचे नूतन सभापती विजय खोत यांनी अचानक काही दुर्गम शाळांना भेटी दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.

अनेक वेळा शिक्षक उशिरा शाळेत जातात, इथपर्यंत ठीक आहे, परंतु इथं तर काही शिक्षक मंडळी शाळेतच जात नाहीत, असा भयंकर प्रकार समोर आला आहे. यावर कढी म्हणून कि, काय मस्टर मध्ये रजेचा अर्ज फक्त ठेवून दिला जातो, आणि शाळेत दुसऱ्या दिवशी रुजू झाल्यानंतर त्या अर्जाला केराची टोपली दाखवली जाते. विशेष म्हणजे यावर कोणताही प्रशासकीय उपाय नाही, असे समजते आहे. अशाप्रकारे दांडी मारल्यास आणि सापडल्यास केवळ विनावेतन रजा एवढीच शिक्षा आहे. यापलीकडे पंचायत समिती अथवा,गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे अधिकार नसल्याचे समजते. यावरून आणखी काही प्रकरण पुढे गेले कि, शिक्षक संघटना यामध्ये मध्यस्थी करतात, असे समजते.

दि.२५ फेब्रुवारी रोजी पंचायत समिती चे सभापती विजय खोत यांनी बुरंबाळ शाळेला भेट दिली असता, सुरज दशरथ पवार , कुंभवडे विद्यामंदिर चे संजय आत्माराम पाटील हे अनधिकृत रित्या गैरहजर होते., नवलाईदेवीवाडी येथील श्रीमती सुनिता हरी डोंगरे या शिक्षिका तर २२ फेब्रुवारी पासून २५ फेब्रुवारी पर्यंत गैरहजर होत्या. विद्यामंदिर पारिवणे चे शिक्षक तुकाराम गोपाल ऐनवाड हे २२ ते २५ फेब्रुवारी पर्यंत गैरहजर होते. विद्यामंदिर गेळवडे ( बौध्दवाडी ) येथील बंडोबा भीमराव घोळवे हे शिक्षक २४ फेब्रुवारी दुपारनंतर पासून २५ फेब्रुवारी पर्यंत अनधिकृत गैरहजर होते. तसेच अंकुश सीताराम पाटील दि.२२ फेब्रुवारी दुपारनंतर पासून २५ फेब्रुवारी पर्यंत अनधिकृत रित्या गैरहजर असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा प्रकारे येळवण जुगाई येथील मालाईवाडा, म्हाळसवडे धनगर वाडा, पांढरेपाणी, मोसम येथील विद्यामंदिर मधील शिक्षक सुद्धा अनधिकृत रित्या गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. तर शेंबवणे, धुमकवाडी, कुम्भ्याचीवाडी येथील शाळांना तर कुलुपे असल्याचे निदर्शनास आले आहे.


यामुळे शाहुवाडी तालुक्यातील दुर्गम भागातील शिक्षकांच्या या बेजबाबदार वागणुकीमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. तेंव्हा सदरच्या शिक्षकांची चौकशी होवून त्यांच्यावर योग्य ती प्रशाकीय कारवाई व्हावी ,असे सभापती विजय खोत यांनी सूचित केले आहे. तशा आशयाचे पत्र त्यांनी प्रसिद्धीस दिले आहे.