कर्मवीर अण्णांनी बहुजन समाजाला शिक्षणाची दारे उघडल्या मुळेच सुजाण समाज निर्मिती -डॉ. म्हस्के
मलकापूर प्रतिनिधी : बहुजन समाजाला ज्ञानाची दारे उघडी करून समानतेच्या आधारावर सुजाण माणसाची निर्मिती करण्यासाठी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपले सर्वस्व पणाला लावले होते. खऱ्या अर्थाने रयतेला विविध प्रकारचे अधिकार मिळण्यासाठी शिक्षणाला पर्याय नाही. असा आण्णांचा दृष्टीकोन होता. असे मत प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ.ज्ञानदेव म्हस्के यांनी केले.
प्राचार्य डॉ. एन.डी. पाटील महाविद्यालय पेरीड- मलकापूर तालुका शाहुवाडी इथं पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.ज्ञानदेव म्हस्के बोलत होते.
पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३६ वी जयंती न्यू इंग्लिश स्कूल फॉर गर्ल्स मलकापूर, मलकापूर हायस्कूल मलकापूर, श्रीमान ग.रा. वारंगे ज्युनिअर कॉलेज, मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य डॉ. एन.डी. पाटील महाविद्यालय पेरीड- मलकापूर इथं उत्साहात संपन्न झाली.
ते पुढे म्हणाले कि, जातीभेद, अंधश्रद्धा, व कालबाह्य परंपरा हे समाजाच्या प्रगतीचा मोठा अडसर आहेत. आण्णांनी हे ओळखूनच त्यांच्यावरच प्रथमत: घाव घातला होता. मुळातच मनुष्य बुद्धिवान आहे. परंतु त्याच्या नैसर्गिक बुद्धीला चालना देवून विकास साधता येतो. विज्ञान व विवेक यामुळेच आदर्श समाजाची निर्मिती होते.
या समारंभाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव पाटील पेरीडकर (दादा ) होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्जेराव पाटील म्हणाले कि, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यामुळेच बहुजन समाजाचा मोठ्या प्रमाणावर विकास होत आहे. सामाजिक विषमता व समाजातील चुकीच्या कल्पना यांना मूठमाती देणे, हि काळाची गरज आहे.
समारंभाचे औचित्य साधून गुणवान विद्यार्थ्यांचा शैक्षणिक संकुलाद्वारे सत्कार करण्यात आला. यावेळी पारितोषिक वितरणाच्या यादीचे वाचन अनुक्रमे प्रा. डॉ. एस.पी. बनसोडे, विनोद खंडागळे व हरिश्चंद्र प्रधान, तसेच शिवाप्पा पाटील यांनी केले. या समारंभास महाविद्यालय विकास समिती चे सदस्य सुहास पाटील, भारत पाटील, उपप्राचार्य नामदेव आडनाईक, प्रभारी मुख्याध्यापक जे.एस. देशमाने, व श्री मसने यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदर समारंभात सातारा येथील डी.जी. कॉलेज चे ग्रंथपाल एच. वय. माने यांनी डॉ. एन.डी. पाटील महाविद्यालयास ग्रंथ घेण्यासाठी अकरा हजाराची देणगी दिली.
या कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर आण्णांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी रयत गीत सादर केले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी. एन. घोलप यांनी केले. कार्यक्रमाचे आभार श्रीमान ग.रा.वारंगे ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्य व्ही.बी. साठे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. प्रमोद नाईक यांनी केले. यावेळी रयत शैक्षणिक संकुलाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.