ग्रामीण भागातील मुले शैक्षणिक दृष्ट्या प्रगतशील : माजी मंत्री शिवाजीराव नाईक
शिराळा प्रतिनिधी-:
शहरातील मुलांच्या प्रमाणे आज ग्रामीण भागातील ही मुले शैक्षणिक दृष्ट्या आपली प्रगती करून कुटुंबाचा नावलौकिक करत आहेत. उपवळे (ता.शिराळा) येथील सामान्य कुटुंबातील कुमारी प्रियांका भीमराव कदम हिने सीएच्या परीक्षेमध्ये यश संपादन करून आपल्या कुटुंबाची मान उंच करण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी केले.
उपवळे (ता.शिराळा) येथील सामान्य कुटुंबातील कुमारी प्रियांका भीमराव कदम हिने इन्स्टिट्यूट ऑफ चार्टेड अकाउंट्स ऑफ इंडिया यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या सीएच्या फायनल परीक्षेमध्ये यश संपादन केल्याबद्दल तिचा सत्कार माजी मंत्री शिवाजीराव नाईक (साहेब ) यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
श्री. नाईक पुढे म्हणाले, आज स्पर्धा परीक्षा असतील अगर यूपीएससी, एमपीएसी परीक्षेमध्ये अनेक मुलींनी चांगल्या पद्धतीचे प्राविण्य मिळवून यश संपादन केले आहे .आज अनेक क्षेत्र असे आहेत की, उच्च ठिकाणी महिला प्रतिनिधित्व करत असलेल्या पहावयास मिळत आहेत. शिराळासारख्या डोंगरी तालुक्यातील व ग्रामीण भागासह वाडीवस्ती मधून अनेक मुली हिऱ्यासारख्या चमकताना दिसत आहेत. खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेचे यश मानावे लागेल. महात्मा फुले यांनी दीडशे वर्षांपूर्वी एका शाळेची निर्मिती केली, तर संपूर्ण जगाचा कायापालट झालेला दिसून आला आहे. आपल्या कुटुंबातील प्रमुख व्यक्तींनी आपली मुले शिकली पाहिजेत याचा ध्यास घेऊन भविष्यातील पावले टाकणे गरजेचे आहे. असे झाले तरच सामान्य गोरगरीब कुटुंबातील मुले व मुली शैक्षणिक दृष्ट्या उंच गरुड भरारी घेतील.
शिराळा तालुक्यातील मुलींचे सीएच्या परीक्षेकडे अत्यंत अल्पप्रमाण असतानाही, उपवळे सारख्या छोट्या गावातून प्रियांका कदम हिने सीएच्या परीक्षेमध्ये यश संपादन केले आहे. प्रियांकाच्या कष्टाबरोबर आई-वडिलांचे व सर्व कुटुंबातील व्यक्तींचा तिच्या यशामध्ये सहभाग असून कदम कुटुंब कौतुकास पात्र आहे.
यावेळी भीमराव कदम, माजी उपसरपंच दादासो गुरव, प्रवीण पाटील, जयवंत कदम , पोपट कदम, अजित कदम, विक्रम कदम, संग्राम पाटील, प्रदीप कदम सर, बी सी पाटील ,समाधान पाटील आधी मान्यवर उपस्थित होते.