सामाजिक

नाथ फाट्याजवळ दोन एसटीं ची समोरासमोर धडक : २२ जण जखमी

शिराळा प्रतिनिधी:(संतोष बांदिवडेकर) शिराळा येथील नाथफाटा वळणावर दोन एसटी बसच्या अपघातात २२ जण जखमी झाले आहेत. सदर अपघात समोरासमोर झाला असून, दोन्ही गाड्या शिराळा एसटी आगाराच्या आहेत.जखमींना उपचारासाठी शिराळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन्ही चालकांच्या प्रसंगावधानामुळे पुढील अनर्थ टळला.


घटनास्थळावरून व पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, शिराळयाहून बांबवडेकडे क्रमांक (एम एच ४०- एन ९२७९) गाडी चालली होती. तर बांबवडेहुन इस्लामपूरकडे क्रमांक (एम एच १४ बी टी ३३६) हि गाडी निघाली होती. नाथ फाटा चौकातील धोकादायक वळणावर या दोन्ही गाड्या आल्या. परंतु पाऊस असल्याने दोन्ही चालकांना गाड्या दिसल्या नाहीत. चालकांच्या प्रसांगवधानामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. अन्यथा बाजूला चर असल्याने दोन्ही मधील एक गाडी पलटी होण्याची शक्यता होती. यावेळी गाड्यांची समोरासमोर धडक झाली. धडक बसल्यावर अनेक प्रवाशी पुढील बाकड्यावर आदळले. यामुळे तोंड, दात, गळा, डोके, हनवटी यास मार बसून जखमी झाले आहेत. यांना तातडीने प्रहार संघटनेच्या गाडीने व १०८ रुग्णवाहिका मधून उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर डॉ.अनिरुद्ध काकडे, डॉ. योगिता माने, डॉ.अश्विनी पुरी, डॉ.आनंदराव पाटील, व कर्मचारी वर्गाने तातडीने उपचार केले. जखमींना एक हजार व पाचशे रुपये तातडीची मदत एस टी महामंडळाकडून देण्यात आली आहे.


घटनेची माहिती मिळताच आमदार मानसिंगराव नाईक यांनी घटनास्थळी व शिराळा येथील उप जिल्हा रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस करून त्यांना धीर दिला. वैद्याकीय अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. जखमींच्या उपचारात हलगर्जीपणा होऊ नये. अधिक उपचाराची आवश्यकता असलेल्या जखमी रुग्णांना सांगलीला पाठवावे, अशा सूचना केल्या. तसेच जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित देशमुख व माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक यांनी शिराळा ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमींची चौकशी केली.


सदर घटनेची फिर्याद संजय यादव बांबवडे ता.शाहूवाडी व सचिन पाटील (रेठरे धरण, वाळवा) यांनी शिराळा पोलीस ठाण्यात दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जयसिंग पाटील हे करीत आहेत.


अपघातातील जखमी पुढीलप्रमाणे – जालिंदर पांडुरंग शिंदे (वय ३९ रा.कांदे), कल्पना अरुण घोलप (वय ४५ रा इस्लामपूर), येसूबाई आप्पासाहेब सोनवणे (वय५५ रा.आष्टा ), दर्शना नामदेव थोरात ( वय १६ रा.खरातवाडी) ,रेखा प्रकाश पाटील (वय ४५ रा.इस्लामपूर), आक्काताई जगन्नाथ देसाई (वय७५ रा.भाटशिरगाव ),शारदा पांडुरंग जाधव ( वय ४५ , रा.माणगाव), सविता रामचंद्र घाडगे (वय ४५ , रा.माणगाव), सजाबाई विश्वास काळोखे (वय ७० रा.ऐतवडे बुद्रुक ), इंदूबाई काकासाहेब मोरे ( वय ६० रा.सागाव), मालन पांडुरंग सुतार (वय ५०, रा सागाव), पार्वती रंगराव पाटील (वय६५ रा. सागाव),शोभा भीमराव कुंभार (वय ५५ रा.कांदे), दत्तात्रय दिनकर गुरव (वय ५२ रा.पुणे), वसंत दत्तू माने ( वय ७० ), दादासाहेब दत्तू सातपुते (वय ७०रा. नाटोली), जालिंदर पांडुरंग शिंदे (वय ४९ , रा. कांदे), उज्वला सुभाष पाटील (वय४५ रा.तडवळे), सानिका सुभाष पाटील (वय २२ रा.तडवळे), पांडुरंग चंद्र पाटील ( वय ७८ रा.नाटोली), प्रणाली सुरेश गायकवाड (वय २२ , रा.कापसी), साहिल अरुण घोलप ( वय १९ रा.इस्लामपूर) अशी आहेत.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!