बाळासाहेबांची शिवसेना यांचा शाहुवाडी तालुक्यात प्रवेश : श्री विजयसिंह देसाई तालुकाप्रमुख
बांबवडे : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या शाहुवाडी तालुकाप्रमुख पदी विजयसिंह देसाई सरकार यांची नियुक्ती पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आली. तशा आशयाचे नियुक्तीपत्र देखील विजयसिंह देसाई सरकार यांना देण्यात आले आहे. या नियुक्तीमुळे शाहुवाडी तालुक्यात बाळासाहेबांची शिवसेना प्रवेशकर्ती झाली आहे.

विजयसिंह देसाई सरकार हे माजी खासदार निवेदिता माने यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांच्यानंतर विद्यमान खासदार धैर्यशील माने यांचे कट्टर समर्थक आहेत. धैर्यशील माने हे शिवसेनेच्या चिन्हावर हातकणंगले लोकसभा मतदार संघातून निवडून आले होते. काही महिन्यांपूर्वी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडात त्यांच्यासोबत खासदार धैर्यशील माने गेल्यामुळे ते सध्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षात सक्रीय आहेत.

त्यामुळे पक्ष वाढीसाठी शाहुवाडी तालुक्यात या पक्षाची मुळे खोलवर रुजवण्यासाठी विजयसिंह देसाई यांची शाहुवाडी तालुकाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. श्री विजयसिंह देसाई सरकार यांना सुमारे ३० वर्षे राजकारणाचा अनुभव आहे. माने यांच्या गटात येण्यापूर्वी ते माजी खासदार स्व.उदयसिंगराव गायकवाड गटात सक्रीय होते. त्यामुळे राजकारणाचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. या अनुभवाचा फायदा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला झाल्याशिवाय राहणार नाही.