शाहुवाडी तालुक्यातील कोळगाव मधील मागासवर्गीय महिलेचा आत्मदहनाचा इशारा : या महिलेला न्याय मिळणार का ?


शाहुवाडी : शाहुवाडी तालुक्यातील कोळगाव येथील एका मागासवर्गीय महिलेने कुटुंबासहित आत्मदहन करण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे तहसीलदार कार्यालयास दिला आहे.


कोळगाव ता.शाहुवाडी येथील श्रीमती वैजयंताबाई दगडू कांबळे यांच्या स्वमालकीच्या जागेत शौचालयाचे बांधकाम सुरु असताना , जितेंद्र चंद्राप्पा कांबळे, व अशोक चंद्राप्पा कांबळे यांनी जबरदस्तीने हे बांधकाम पाडले. जितेंद्र व अशोक कांबळे यांच्या मते त्यांची जागा श्रीमती वैजायांताबाई कांबळे यांच्या पडसर जागेत येत आहे, असे त्यांचे मत आहे. परंतु माझ्या महसुली पुराव्यानुसार माझी जागा ११४० चौ.मी.मिळकत क्रमांक ३५३ नुसार आहे. त्या अनुषंगाने त्यांची जागा माझ्या मिळकत मध्ये २ ते ३ फुट अतिक्रमित होत आहे. मी माझ्या हद्दीत शौचालय बांधत असताना या दोघांनी जबरदस्तीने हे बांधकाम पाडले आहे. त्याचबरोबर मला व माझ्या कुटुंबाला नाहक त्रास देत आहेत.


याबाबत गटविकास अधिकारी शाहुवाडी पंचायत समिती, शाहुवाडी पोलीस ठाणे, तसेच विस्तार अधिकारी एस.बी. इंगवले या मंडळींकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. परंतु याबाबत कुणीही दखल घेत नाहीत. तसेच गावचे सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील, तसेच ग्रामपंचायत सदस्य यानाही याबाबत माहिती दिली आहे. यामध्ये ग्रामसेवक कोकाटे व मंडळी यांनी माझे खोटे संमतीपत्र तयार करून रमाई आवास योजनेत ते बांधकाम बसवून या सर्वांनी शासनाची सुद्धा दिशाभूल केली आहे. तसेच येथील मोहन पोवार यांनी आम्हाला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाणीची धमकी दिली आहे. त्यांच्यामुळे आमच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आमचे जगणे असह्य झाले आहे.


आपण चौकशी करून आठ दिवसात आम्हाला न्याय द्यावा, अन्यथा मी व माझे कुटुंब एकत्रित रित्या आत्मदहन करणार आहोत. या सर्व घडामोडीस आपले प्रशासन जबाबदार असेल. एका विधवेला जर शासन न्याय देणार नसेल, तर आमच्या जगण्याला काय अर्थ आहे. अशा आशयाचे निवेदन दि. ७ एप्रिल २०२१ रोजी तहसीलदार कार्यालयास दिले आहे.


याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे, अशी विनंती देखील श्रीमती कांबळे यांनी केली आहे.

0
error: Content is protected !!