रत्नागिरीतील कळंबूशी इथे साकव कोसळला :आठ जखमी
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कळंबूशी इथं होळीच्या दिवशी लोखंडी साकव मधोमध कोसळल्यामुळे दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत आठ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे.
कोकणात होळीच्या दिवशी ग्रामस्थ एकत्र येवून होळी खांद्यावर घेवून होळी कुंडावर घेवून जातात. परंतु संगमेश्वर तालुक्यातील कळंबूशी इथं ग्रामस्थ खांद्यावरून होळी घेवून जात असताना, येथील ३५ वर्षे जुना असलेल्या साकव वर ग्रामस्थ आल्यानंतर, या सगळ्यांचा भार अधिक झाल्याने या जुना साकव मधोमध कोसळला. त्यामुळे साकव वरील ग्रामस्थ नदीत कोसळले. सुदैवाने नदी कोरडी आहे. तरीसुद्धा साकव वरून कोसळल्याने बरेचजण जखमी झाले आहेत. पैकी आठ जण गंभीर जखमी झाल्याने, त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.