नूतन जि.प. सदस्य श्री विजय बोरगे व रेश्मा देसाई यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई ?
पिशवी जिल्हा परिषद मतदारसंघाचे नूतन सदस्य श्री विजय बोरगे हे आपल्या जि.प. सभागृहाच्या पहिल्याच आणि मतदानाच्या सभेला अनुपस्थित राहिले.हि गोष्ट मतदार संघाच्या दृष्टीने दुर्दैवी म्हणावी लागेल. हेच नव्हे तर रेश्मा देसाई या सुध्दा गैरहजर राहिल्या. हि बाब लोकशाहीच्या दृष्टीने सुद्धा खेदजनक आहे. यावर त्यांच्यावर कारवाई होणार न होणार ,हा भाग अलाहिदा आहे. परंतु ज्या लोकशाहीने आपल्याला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली,त्याच सभागृहाच्या नेतृत्वाच्या निवडी दिवशी दाखवलेली अनुपस्थिती, म्हणजे आपले लगाम दुसऱ्याच्या हाती आहेत, याचेच द्योतक आहे. लोकशाहीला आर्थिक राजकारणाच्या दावणीला बांधणे, हे दु:खदायक आहे.
सत्तेसाठी सुरु असलेला घोडेबाजार देशाला कोणत्या समृद्धीकडे नेणार ? हा प्रश्नच आहे. एकीकडे जिल्हापरिषदेत कॉंग्रेस बरोबर जाण्याची गोष्ट करताना, आर्थिक स्त्रोत जपण्यासाठी ‘गोकुळ’ कार्डाला बिचकलेले राजकारणी, आणि दुसरीकडे निष्ठेच्या गप्पा मारणारी मंडळी कधी दावणीला बांधली गेली, हे कळलेसुद्धा नाही. हे वरिष्ठ लोकप्रतिनिधींचे वर्तन असताना, नूतन सदस्यांकडून अपेक्षा ती काय असणार ?
लोकशाहीत आपण ज्या लोकप्रतिनिधींना निवडून देतो, ते आपले प्रश्न मांडण्यासाठी. तीच मंडळी सभागृहाचं नेतृत्व निवडताना अनुपस्थित राहतील, ,तर मग आपल्या विकासाच्या गोष्टी निवडणुकी प्रसंगी करणारी मंडळी आपल्याला न्याय तो काय देणार ? ज्यांना आपले नेतृत्व निवडण्याची क्षमता नाही, ते विकास काय करणार ?