वीज कनेक्शन न मिळाल्याने गुनुगाडे यांचे बेमुदत धरणे आंदोलन
मलकापूर (प्रतिनिधी) : टेकोली तालुका शाहुवाडी येथील तानाजी पांडू गुनुगडे यांनी वीज कनेक्शन शेतीसाठी न मिळाल्याने बेमुदत धरणे आंदोलन शाहुवाडी तहसील कार्यालयासमोर सुरु केले आहे.
याबाबत सविस्तर हकीकत अशी कि,तानाजी गुनुगडे यांच्या मालकी च्या सात एकर शेतीमध्ये ऊस लावला असून यासाठी त्यांनी स्थानिक सेवा संस्थेकडून कर्ज घेतले आहे. तसेच शेतीसाठी लागणारा पाणी परवाना सुद्धा संबंधित खात्याकडून घेतला आहे .परंतु वीज वितरण कंपनीच्या हलगर्जी पणामुळे त्यांना वीज कनेक्शन अद्याप मिळालेले नाही. दरम्यान ऊस लावण्यासाठी गरजेची असलेली शेतीची मशागत खते, बियाणे शेतात टाकले असून केवळ वीज कनेक्शन नसल्याने पाण्याअभावी वळून चालले आहे .त्यामुळे एका शेतकऱ्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा रहणार असून यास केवळ वीज वितरण कंपनी जबाबदार आहे, यासाठी न्याय मिळावा म्हणून, धरणे आंदोलन करत असल्याचे तानाजी गुनुगडे यांनी निवेदनाद्वारे सांगितले.
दरम्यान वीज वितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी श्री. हजारे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले कि, संदर्भीय कनेक्शन देण्यास आमची हरकत नाही,परंतु अर्जदाराच्या म्हणण्यानुसार जुन्याच कनेक्शन वर नवी जोडणी करावी, ते शक्य नाही, कारण जुने कनेक्शन बंद होवून सहा महिने उलटले असून, पुन्हा त्याच कनेक्शन वर दुसरे कनेक्शन नियमानुसार देता येत नाही. नवीन गटाचे कनेक्शन त्वरित उपलब्ध करून देण्यास आमची हरकत नाही , असेही अधिकारी श्री. हजारे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.