काम अगोदर मंजुरी नंतर : शाहुवाडी बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार
मलकापूर (प्रतिनिधी ) : शाहुवाडी पंचायत समितीच्या भोंगळ कारभाराचा उत्तम नमुना म्हणजे शित्तूर -वारुण इथं काम अगोदर आणि मंजुरी नंतर अशी अवस्था दिसून आली असून, बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी ठेकेदारांच्या मर्जीनुसार वागत आहेत. तसेच अर्थ विभागात ४९ लाख रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप, नूतन पंचायत समिती सदस्य श्री विजय खोत यांनी केला आहे. तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी न झाल्यास उपोषण करणार असल्याचा इशाराही विजय खोत यांनी दिला आहे.
शित्तूर वारुण पैकी राउत वाडी येथील कामाची वर्क ऑर्डर २३ मार्च २०१७ ची असून हे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. तसेच शित्तूर-वारुण , वेताळमाळ येथील दहा लाख रुपयांचा रस्ता कुणी केला ? याची माहिती बांधकाम विभागाकडे नाही. यामुळे बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
अमेणी, कडवे, शित्तूर- वारुण, सावर्डे-बुद्रुक, मांजरे, माण,गमेवाडी, आदि बहुतांश गावात कागदावर कामे करून ठेकेदार व अधिकाऱ्यांनी मिळून शासनाची फसवणूक केली आहे. असाही आरोप श्री विजय खोत यांनी केला आहे.