दारूमुक्त महामार्गामुळे हॉटेल व्यवसायावर गदा ?
बांबवडे : महामार्गापासून ५०० मीटर अंतरातील मद्य विक्रेतांवर गदा येणार असून, यामुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत येणार आहे. ड्रंक अँड ड्राईव्ह या गुन्ह्याला पायबंद बसावा, म्हणून काढलेला हा उपाय हॉटेल व्यावसाईकांसह शासनाच्या महसुलावर देखील परिणाम करणारा आहे.
ज्या मद्यपींना प्यायची आहे,ते कुठेही जावून पिणारच. त्यामुळे महामार्गावर असलेल्या व्यवसायांना कचाट्यात पकडणे, हितावह नाही. त्याचबरोबर ह्या निर्णयामुळे विनापरवाना मद्यविक्रीला दुजोरा मिळाल्याशिवाय रहाणार नाही. तसेच यामुळे हॉटेलात कष्ट करून राबणाऱ्या वेटर्स मंडळींनाही बेरोजगारीला सामोरे जावे लागणार आहे. याचा विचार अद्याप झालेला नाही. त्याचबरोबर यातून मिळणारा महसूल सुद्धा मोठ्या प्रमाणावर असतो. त्यालादेखील टाच बसणार आहे.
त्यामुळे हा निर्णय किती योग्य,किती अयोग्य हा प्रश्न चिंतनीय आहे. अशीच चर्चा समाजातून ऐकावयास मिळत आहे.