चैत्र पौर्णिमेची येळवण जुगाई यात्रा
येळवण जुगाई प्रतिनिधी(इस्माईल महात): येळवण जुगाई येथील जुगाई देवीची यात्रा चैत्र पौर्णिमेला असते. ती आजपासून सुरु होत आहे. प्रशासन व ग्रामस्थांच्या सयुंक्त विद्यमाने जुगाई देवी यात्रा कमिटीने संयोगिताराजे छत्रपति यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेचे नियोजन केले आहे. खा.संभाजीराजे यांनी येळवण जुगाई हे गाव दत्तक घेतले आहे. यात्रा काळात भाविकांच्या सोयीसुविधांवर जास्त भर देण्यात आला आहे.प्रशस्त व स्वच्छ मंदिर परिसर, रांगेतून दर्शन , अतिदक्षता कक्ष , सासनकाठ्या आदींचे नियोजन करण्यात आले आहे. खा.संभाजीराजे छत्रपति यांच्याकडून यावर्षी मंदिरास विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यात्रे दरम्यान पाण्याची सोय, गिरगाव बॉक्साईट माईन्स ने केली आहे. तसेच या दोन दिवसात बॉक्साईट बंद ठेवण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र मांजरे व उपकेंद्र येळवण जुगाई यांच्याकडून रोगप्रतिबंधक औषधांची व्यवस्था करण्यात आली आहे. एस.टी.मलकापूर आगाराकडून एस टी बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच पालखी उत्सव रात्रीच्या वेळेत असल्याने अखंडित विद्युत पुरवठा ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशासनाच्या या कारभारावर शाहुवाडीचे तहसीलदार चंद्रशेखर सानप लक्ष ठेऊन आहेत.
यात्रे दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, अशी खबरदारी शाहुवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक अनिल गाडे व पोलीस कर्मचारी घेत आहेत.
यात्रेबाबत ग्रामस्थांना प्रशासन, संयोगिताराजे छत्रपति , धेर्यशील माने, तहसीलदार चंद्रशेखर सानप, शाहुवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उदयकुमार पाटील, नगरसेवक सुहास पाटील, माजी सरपंच राजाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच सुनिता कोटकर , उपसरपंच सत्यवान खेतल, देवस्थान समिती अध्यक्ष विठोबा पाटील व सर्व सदस्य, ग्रामपंचायत सदस्य , पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष धोंडीबा कुडाळकर , रघुनाथ वायकूळ, राजाराम कांबळे, शरद कांबळे व ग्रामस्थ करीत आहेत.