काम न करताच बिले काढलीत : पंतप्रधानांकडे तक्रार
मलकापूर ( प्रतिनिधी ) : शाहुवाडी ते पणुंद्रे गावच्या रस्ता बांधकामाची बिले काम न करताच काढण्यात आल्याची तक्रार पणुंद्रे गावचे रहिवासी संतोष लोखंडे यांनी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
आपल्या निवेदनात श्री लोखंडे यांनी नमूद केले आहे कि, गेली ३ वर्षे शाहुवाडी तालुक्यातील रा.म.मा. २०४ ते कोळगाव टेकोली पणुंद्रे रस्ता इजीमा.१७५ कि.मि.०/९००ते१/२८५ रस्ता सुधारणा ची निविदा काढून काम न झालेल्या रस्त्याचे बनावट फोटो काढून ते ग्रामीण रस्ते व विकास या विभागाला देवून ठेकेदार व अधिकाऱ्यांनी परस्पर रक्कम लाटली आहे.
तसेच कार्यकारी अभियंता बांधकाम जिल्हा कोल्हापूर यांनी १४,८७,८२५/०९ रुपये या खर्चाची निविदा ठेकेदार राहुल आनंदा भोसले रा.कदमवाडी,तालुका करवीर जि.कोल्हापूर यांना दिली होती,तरी सदरच्या रस्त्याचे काम अद्याप झालेले नाही.
तसेच शाहुवाडी ते पणुंद्रे दुसऱ्या टप्प्याचे नुतनीकरण ५०० क्रमांक निविदा रक्कम १५,०१,२३२/- रुपये मंजूर होवूनही काम झालेले नाही,या कामाचे ठेकेदार एन.एस.इनामदार रा.सावर्डे तालुका कागल जि.कोल्हापूर, हे आहेत. यांनीही रक्कम घेवूनही अद्याप काम झालेले नाही.
याच कामाची निविदा ०६-०२-२०१५ रोजी पुन्हा काढून हे काम श्री महादेव आनंदा पाटील रा.पिशवी,तालुका शाहुवाडी जि.कोल्हापूर यांना देण्यात आली.अद्याप काम पूर्ण झालेले नाही.
२००३ पासून २०१५ पर्यंत निविदा काढूनही पैसे उचलूनही अद्याप काम न झालेने एकूण शासकीय यंत्रणा काय काम करते यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.दरम्यान १६-०२-२०१६ रोजी सार्वजनिक बांधकाम महाराष्ट्र शासन यांनी असा अहवाल शासनाला दिला कि,सदर जागेवर तक्रारदार व सरपंच यांनी पाहणी करून समाधान व्यक्त केले आहे. परंतु वस्तुस्थितीनुसार मी तक्रारदार किंवा सरपंच आम्हाला कुणीही बोलावले नाही,तसेच कोणत्याही प्रकारचे समाधान रस्ता न करता कसे व्यक्त केले जाईल. त्यामुळे ठेकेदार व शासकीय अधिकाऱ्यांनी केलेले साटेलोटे पाहता, हि बाब अतिशय गंभीर असून सदर मंडळींवर कारवाई व्हावी,अशी अपेक्षा श्री. लोखंडे यांनी निवेदनातून व्यक्त केली आहे.