नेहमी शेतकऱ्याचा च बळी का?
बांबवडे ( प्रतिनिधी ) ज्या ज्या वेळी प्रशासनाला जमिनीची गरज लागते,त्य त्या वेळी शेतकऱ्यालाच बळीचा बकरा बनवला जातो. याचे प्रत्यंतर पुन्हा एकदा शाहुवाडी तालुक्यात येवू घातले आहे. रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गाचे चौपदरीकरण लवकरच करण्यात येणार असून त्यासाठी, गोगवे,ठमकेवाडी , बांबवडे, डोणोली, भाडळे आदि गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन केल्या जाणार आहेत. यामुळे शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मुळात शेतकरी आर्थिकदृष्ट्या संकटात आहे. एकीकडे दुष्काळ, किंवा ओला दुष्काळ असे अस्मानी संकट, तर दुसरीकडे वेगवेगळ्या कारणासाठी शेतकऱ्यांकडून जमीन संपादित करून प्रशासनाने आणलेले सुलतानी संकट. या सगळ्यांना केवळ शेतकऱ्यानेच का सामोरे जायचे, हे न सुटणारे कोडे आहे. जनतेची पिण्याच्या पाण्याची समस्या असो, अथवा रस्त्यांची समस्या असो,यासाठी केवळ शेतकऱ्यांकडून च जमीन संपादित केली जाते. देशावर जेंव्हा आर्थिक संकट येते, तेंव्हा प्रशासन अमाप संपत्ती असणाऱ्यांकडून कधी संपत्ती काढून घेतल्याचे, ऐकिवात नाही. शेतकऱ्यांकडून जुजबी भावाने जमीन हक्काने संपादित करायची, आणि त्याच्या कर्जमाफीच्या प्रश्नाला मात्र सोयीस्करपणे बगल द्यायची, हि शासनाची किमया जनतेच्या लक्षात आलेली नाही,असे वाटण्याचे काहीच कारण नाही. दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी ३५ वर्षापूर्वी कॅनॉल साठी दिलेल्या जमिनींमुळे शेतकरी तोट्यात गेला आहे. बरं त्यानंतर अजूनही कॅनॉल पूर्णतः तयार झालेला नाही. मग शेतकऱ्यांच्या जमिनी काय कंत्राटदार जगविण्यासाठी घेतल्या होत्या काय ? या प्रश्नाचे अजूनही उत्तर मिळाले नसताना , रस्ता चौपदरीकरणाचे नवे भूत शेतकऱ्यापुढे उभे राहिले आहे.
एकंदरीत काय नेहमीच शेतकऱ्यांचांच बळी जातोय, याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर लोकप्रतिनिधींनी देखील लक्ष देणे गरजेचे आहे.