इको-सेन्सिटिव्ह झोन मधील गावांनी हरकती घ्याव्यात-आम.सत्यजित पाटील
बांबवडे ( प्रतिनिधी ) : शाहुवाडी तालुक्यातील पश्चिम घाटातील सुमारे ५१ गावांचा इको-सेन्सिटिव्ह झोन मध्ये समावेश होत आहे. अशा गावच्या ग्रामपंचायतींनी या प्रस्तावास हरकत घेण्याची अंतिम मुदत २७ एप्रिल असून, यापुढे हा प्रस्ताव मंजूर होईल.याचा त्रास आपल्या पश्चिम भागाला झाल्याशिवाय रहाणार नाही,यासाठी ग्रामपंचायतींनी २७ एप्रिल पूर्वी हरकती घ्याव्यात, असे आवाहन आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांनी केले आहे.
या क्षेत्रात येणाऱ्या गावांमध्ये खासगी जमिनी, गावठाण, गायरान आदि क्षेत्रात औद्योगिक विकास , इमारत बांधकाम, खाण उद्योग, शेती व्यवसाय आदि क्षेत्रांवर निर्बंध येणार आहेत.
ज्या हरकती २७ एप्रिल पर्यंत येतील त्यांच्यावर केंद्राकडून निर्णय घेण्यात येईल. त्यानंतर या प्रस्तावास विरोध अथवा हरकत घेता येणार नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी इको-सेन्सिटिव्ह झोन च्या या अधिसूचनेच्या विरोधात २७ एप्रिल च्या आत केंद्रीय पर्यावरण,वन व जलवायू परिवर्तन मंत्रालय ,इंदिरा भवन, जोरबाग रोड ,नवी दिल्ली, या पत्त्यावर अथवा esz-menfnic.in या ई-मेल वर आपल्या हरकती नोंदवाव्यात. असेही आमदार पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.