गोगवे येथील अपघातात २ ठार
बांबवडे ( प्रतिनिधी ): गोगवे तालुका शाहुवाडी येथील कोल्हापूर-मलकापूर रोडवर चार चाकी वाहन रस्ता सोडून खाली आल्याने झालेल्या अपघातात भाडळे पैकी व्हरकटवाडी येथील कृष्णात रंगराव जाधव ( वय ३२ वर्षे ), व सौ. भारती भीमराव जाधव वय (४५ वर्षे ) हि दोघे जागीच ठार झालीत.तर काही किरकोळ जखमी झाल्याने बांबवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहिती नुसार भाडळे पैकी व्हरकट वाडी येथील काही ग्रामस्थ येळवण-जुगाई इथं देवदर्शनाला सकाळी गेली होती. देवदर्शन आटपून येत असताना गोगवे येथील एसटी स्टँड च्या अलीकडे असलेल्या आनंदा शंकर माने व शंकर दत्तू माने यांच्या रहात्या घरात वाहन घुसले. रस्ता सोडून वाहन खाली आल्याने वाहनातील चालक कृष्णात जाधव व भारती भीमराव जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच माने यांच्या घराचे तसेच बोअरचे नुकसान झाले आहे.
याबाबत बांबवडे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. अधीक तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील , विश्वास चिले आदि पोलीस कर्मचारी करीत आहेत.