जीवन आणि मरण यातील अंतर केवळ एक ” शिंक ” ?
वारणानगर (प्रतिनिधी ) : कोडोली ता.पन्हाळा येथे राहणारा शिरीष शिवाजी चोपडे वय अंदाजे ३५ हा इसम डॉ.नि मृत घोषित करून हॉस्पिटल मधून अंतिम विधीसाठी घरी आणला असता,त्याला एक शिंक आली आणि अचानक जिवंत झाला आहे. याला पुढील उपचारासाठी सीपीआर,कोल्हापूर येथे नेण्यात आले आहे.
अधिक माहिती अशी,कोडोली ता.पन्हाळा येथे राहणार शिरीष शिवाजी चोपडे याला शुगरचा त्रास असल्याने, त्याला कोडोली येथील श्री हॉस्पिटल येथे नेण्यात आले ,पण डॉ.पाटील यांनी त्याला कोल्हापूरला नेण्यास सांगितले. शिरीष यांच्या घरच्या लोकांनी शिरीष यास कोल्हापूर येथील डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास पुढील उपचारासाठी दाखल केले, तेंव्हा त्याच्या दोन्ही किडनी फेल व शुगर पूर्ण शरीरामध्ये पसरली असल्याचे सांगण्यात आले. त्याला २ दिवस व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आले. दिनांक मंगळवार २५ रोजी सकाळी डॉक्टरांनी शिरीष यास मृत घोषित केले. मृत घोषित केल्यानंतर कोडोली येथील त्याच्या गावी त्याच्या अंत्यविधीची तयारी सुरू झाली. दफन करण्यासाठी खडा काढण्यात आला, कफन तयार करण्यात आले.
शिरीष याचे मृत शरीर रात्री ९ वाजण्याच्या सुमारास कोडोली येथील गावी आणले असता, मृत शिरीषला अचानक शिंक आली,आणि डोळे उघडले.. यामुळे सर्व आश्चर्यचकित झाले असून त्याला उपचारासाठी सीपीआर,कोल्हापूर येथे नेण्यात आले आहे.
एकूणच मृत शिरीषला मिळालेले जीवदान ईश्वर इच्छेमुळे मिळाले कि,शिरीष मृत झाल्याचे निदानाच चुकीचे होते, हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे.