देव चोरला माझा…..
तरुणाईच्या हृदयातील एक अढंळ स्थान. गरिबांना लाभलेला एक भक्कम आधार. दादागिरी करणाऱ्यांसाठी एक कर्दनकाळ …अशा अनेक विशेषणांनी तयार झालेलं व्यक्तिमत्वं म्हणजे अशोक भाऊ. हेच व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेलंय. ह्या व्यक्तिमत्वाच्या हरपण्याने तरुणाईच्या पाठीशी उभा असणारा त्यांचा देव, आज त्यांना दिसेनासा झालांय.
नेहमी माणूस आपल्या कर्तुत्वाने आपले स्थान निर्माण करतो. असेच स्थान अशोकराव घोडे-पाटील यांनी निर्माण केले आहे. आज शरीराने जरी ते आपल्यात नसले तरी, तरुणाईच्या हृदयात मात्र कायमस्वरूपी राहणार आहेत. तरुण म्हटलं कि,दंगा मस्ती आली, पण अशावेळी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे त्यांचे घरचे नाहीत, तर अशोक भाऊ होते. त्यामुळे हि तरुणाई बिनधास्त होती. म्हणूनच अशोक भाऊ यांच्या जाण्याने खऱ्या अर्थाने हि तरुणाई पोरकी झाली. म्हणूनच त्यांच्या अंत्ययात्रेवेळी सर्वात जास्त शोकाकुल होती,ती म्हणजे तरुणाई. मग ती कोणत्याही जाती धर्माची असो. अशोक भाऊंच्या आश्रयाला एकदा आली, कि त्यांना सोडून जायची नाही.
एकेकाळी असाच एक समाज बांबवडे त आला होता, आणि तो स्थिरावला देखील अशोक भाऊंमुळे. असे अनेक किस्से आपल्याला त्यांच्याबद्दल ऐकावयास मिळतील. समाजात आपले स्वतःचे स्थान स्वकर्तुत्वावर निर्माण करणारं हे नेतृत्व नेहमीच चर्चेत राहीलं. भाऊ जेंव्हा आजारी पडले, तेंव्हाच सगळ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. पण वाघाच्या काळजाच्या या वाघाने त्यावेळी आजारावर यशस्वी मात केली. त्यानंतर मात्र भाऊ बरे झाले, आणि काळजी करण्यासारखे काही नाही,असेच वातावरण झाले. अवघी तरुणाई बिनधास्त झाली. पण नियतीचा खेळ मात्र कुणाला कळलांच नाही. सगळं आलबेल असताना, चोर पावलाने काळ कधी आला,ते कळलंच नाही. आणि या काळानं एका वाघाचा घास घेतला.
हंबरडा फुटला, तरुणाई बिथरली, भाऊंना दवाखान्यात नेण्यात आले, तरीही असं काही घडेल, असं कुणालाच वाटलं नव्हतं. पण नियती आपला खेळ खेळून गेली होती,आणि तरुणाईचा खऱ्या अर्थाने देव चोरला गेला…..