पै. प्रशांत शिंदे मांगले चा ” सरपंच केसरी”
शिराळा( प्रतिनिधी ) : मांगले ( ता.शिराळा) येथे ग्रामस्थ व रामगिरी महाराज तालीम मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या कुस्ती मैदानात कोल्हापूरच्या न्यू मोतीबाग तालीम मंडळाच्या पै. प्रशांत शिंदेने कोल्हापूरच्याच मोतीबाग तालीम मंडळाच्या कपिल सनगरवर गुणाने मात करून प्रथम क्रमांकाचा “सरपंच केसरी” किताब मिळवला.
आमदार शिवाजीराव नाईक, सरपंच विजय पाटील यांच्या हस्ते “सरपंच केसरी” किताब देण्यात आला. येथे नव्याने उभारलेल्या शिराळा तालुका क्रीडांगणावर हे कुस्ती मैदान यावर्षी पहिल्यांदाच पार पडले. यावर्षी मैदानात लहान मोठ्या दीडशेहून अधिक कुस्त्या झाल्या. राजमाता जिजाऊ दुध संस्था आणि यशवंत युवक संघटनेने पुरस्कृत केलेल्या दुस-या क्रमांकाच्या कुस्तीत कोल्हापूरच्या शाहू कुस्ती केंद्राच्या विक्रम चव्हाणने, सांगलीच्या पवार तालीम मंडळाच्या शिवाजी तांबेला घुटना डावावर आस्मान दाखवले. तृतीय क्रमांकाच्या मांगले गावातील माजी सैनिकांनी पुरस्कृत केलेली कुस्ती पुण्याच्या अभिजित भोसलेने कोल्हापूरच्या अनिल चव्हाणला गुणावर चीतपट केले . चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीत मांगल्याच्या मनोज पाटीलने कोल्हापूरच्या सचिन कदमला चितपट केले, तर पाचव्या क्रमांकाच्या कुस्तीत मांगल्याच्या सुरज परीटने कुशिरेच्या श्रीकांत लवटेला चीतपट करून कुस्ती शौकिनांची वाहवा मिळवली.
प्रारंभी कुस्ती मैदानाचे पूजन सरपंच विजय पाटील, विश्वास पाटील यांच्या हस्ते झाले. शिराळा पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रल्हाद पाटील, मांगले गावचे माजी सरपंच दत्तात्रय पाटील, राजेंद्र दशवंत, राहुल पवार, मोहन पाटील, माजी सैनिक आनंदराव शेवडे, धनाजी नरुटे, डॉ.अरविंद पवार, संजय परीट, उत्तम गावडे यावेळी उपस्थित होते .
पंच म्हणून प्रकाश पाटील, महेश पाटील, प्रशांत पाटील, केशव पाडळकर, नामदेव पाटील, भालचंद्र पाटील, साजीद सुतार यांनी काम पाहिले. सुरेश जाधव यांनी निवेदक म्हणून काम पाहिले .