बहिणीच लग्न हीच भावाची अखेरची ओवाळणी…शिराळ्यातील घटना
शिराळा ( प्रतनिधी ) : बहिणीच्या पाठवणीच्या समाधानाचे अश्रू विरण्याअगोदरच नियतीचा निरोप आला. आणि २४ वर्षीय अभिषेकला जगाचा निरोप घ्यावा लागला. अभिषेकच्या आईवर तर आभाळच कोसळले. एकीकडे मुलीच्या लग्नाचे समाधान तर दुसरीकडे आयुष्याचा एकमेव आधार असलेल्या अभिषेकलाच जगाचा निरोप घ्यावा लागला. आणि, बहिणीच लग्न हीच भावाची शेवटची भेट ठरली.
याबाबत सविस्तर हकीकत अशी कि, औंढी (ता.शिराळा ) येथील शिवणी धरणात मामाच्या मुलाला वाचवायला गेलेल्या अभिषेक शांताराम जंगम (२४ ) रा.कुंभार गल्ली, शिराळा या युवकाचा बुडून मृत्यू झाला..याबाबतची सचिन देविदास पोवेकर यांनी शिराळा पोलीसात वर्दी दिली आहे. ही घटना सायकांळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत शिराळा पोलीस व घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, अभिषेकच्या बहिणीचा विवाह आज दुपारी साडेबारा वाजता सरूड (ता.शाहुवाडी) जि.कोल्हापूर येथे पार पडला. त्यानंतर तो चार वाजता आपल्या नातेवाईकांच्या सोबत घरी शिराळा येथे आला. दिवसभर उकाडा असल्याने पाहुण्यांच्या मुलांच्या समवेत साडेचार वाजण्याच्या सुमारास अभिषेक त्याच्या मामाचा मुलगा मयुर जंगम, राहुल जंगम, शुभम पोवेकर व इतर मुलांच्या बरोबर शिराळा शहरापासून काही अंतरावर असणा-या औंढी येथील शिवणी धरणामध्ये आंघोळीला गेला. आंघोळ करत असताना, मयुर पाण्यात बुडत असलेचे अभिषेकच्या लक्षात आले. त्यावेळी त्याने तातडीने मयुरला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तो स्वतःबुडाला,तर इतर मुलांनी मयुरला बाहेर काढले.
अभिषेकच्या वडीलांचा गेल्या दहा वर्षापुर्वी मृत्यू झाला होता.त्यामुळे घराची जबाबदारी अभिषेकवरच होती.त्याच्या पश्चात आई,लहान भाऊ व एक विवाहीत बहीण असा परिवार आहे.
अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वपनील घोंगडे हे करत आहेत. घटनास्थळी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती.
एकीकडे अभिषेकच्या बहिणीचा लग्न सोहळा व दुसरीकडे त्याच बहिणीच्या, भावाच्या अंत्यविधीची तयारी . या प्रकारामुळे जंगम परिवारावर आनंदाच्या क्षणी दुःखाचा डोंगर कोसळला. अशा या दुर्दैवी घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या बहिणीच्या आयुष्यातील सोनेरी क्षण, भावाच्या मृत्यूने काळवंडले असून, लग्नात झालेली ही बहीण भावाची शेवटची भेट ठरली.