आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या न्यायासाठी “अस्थी यात्रा “
कोडोली प्रतिनिधी:-
आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी, तसेच त्यांच्या बलिदानाचे महत्व शासनाला पटवून देण्यासाठी वाळवा तालुक्यातील साखराळे येथील शेतकरी विजय जाधव यांनी कोल्हापूर ते मंत्रालय अशी “अस्थी यात्रा” काढली आहे. या यात्रेची सुरुवात पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी विजय सिताफे यांच्या अस्थी घेऊन करण्यात आली.
शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करा, त्यांना कर्ज माफी द्या, शेती मालाला हमी भाव द्या, या मागण्या आता विविध शेतकरी संघटना करू लागल्या आहेत. पण या मागण्यांची शासन स्तरावर दखल घेतली जात नाही. अशातच २ दिवसांपूर्वी कोडोली ता.पन्हाळा येथील शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केली आहे. याबाबत शेतकऱ्यांच्या बलिदानाला न्याय मिळवून देण्यासाठी विजय जाधव, या शेतकऱ्याने “कोल्हापूर ते मंत्रालय” अशी “अस्थी यात्रा” काढली आहे.
विजय जाधव यांनी आज या अस्थी यात्रे ची सुरुवात, कोडोली ता.पन्हाळा येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी विजय सिताफे यांच्या अस्थी घेवून केली.
विजय जाधव या अस्थी घेऊन, इतर आत्महत्या ग्रस्त भागातून दौरा करून मुंबई येथील मंत्रालय इथं जाणार आहे. ते हा संपूर्ण प्रवास एकटे, अनवाणी आणि मोटर सायकलवरून करणार आहेत.