“Run for Peace” या मॅरेथॉन स्पर्धेत केखलेचा “सचिन पाटील” सर्वप्रथम
बांबवडे : सरूड स्पोर्ट्स फौंडेशन ट्रस्ट च्या वतीने “Run for Peace” या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन बुद्ध पौर्णिमेच्या निमित्त करण्यात आले होते. या संस्थेत सरूड गावचे रहिवासी जे कामधंद्याच्या अनुषंगाने मुंबईत स्थित आहेत, अशा तरुण व उत्साही कार्यकर्त्यांनी या संस्थेची निर्मिती केली आहे. यांनी आयोजित केलेल्या या मॅरेथॉन स्पर्धेत सचिन पाटील केखले तालुका पन्हाळा हा प्रथम, तानाजी नलवडे कोरोची तालुका हातकणंगले हा द्वितीय, तर महेश खामकर सातवे तालुका पन्हाळा हा तृतीय क्रमांकाने विजयी झाले आहेत.
या स्पर्धेचे अंतर १० किलोमीटर होते. स्पर्धा शिवशाहू महाविद्यालय सरूड च्या ग्राउंड वरून सुरु झाली. स्पर्धेचा मार्ग सरूड ते बांबवडे व परत बांबवडे ते सरूड असा होता. या स्पर्धेत सुमारे १७० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धकांमध्ये रमेश इंगळे ( वय ७० वर्षे ), प्रसाद जयस्वाल ( वय ५८ वर्षे ) या ज्येष्ठ नागरिकांनी हि सहभाग घेतला होता. स्वप्नाली महागांवकर पेरीड तालुका शाहुवाडी (सध्या मुंबई स्थित ),व वैशाली पवार मुंबई या दोन मुलींनी देखील या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत प्रथम आलेल्या सचिन पाटील ला ३०:०३:२७ एवढा वेळ लागला, तर तानाजी ला ३१:२८:९६,तर महेश खामकर यास ३१:५१:०७ एवढा वेळ लागला आहे.
या स्पर्धेचे आयोजन शाहुवाडी तालुक्यासाठी आदर्श ठरत असून, ‘डी जे’ च्या जमान्यात एका नवीन आदर्शाला सरूड इथून सुरुवात झाली आहे. दरम्यान स्पर्धेचे बक्षीस वितरण संध्याकाळी सात वाजता होणार असून, यावेळी प्रबोधानात्मक, ज.रा.दाभोळे यांचे व्याख्यान होणार आहे. यावेळी पोलीस उपनिरीक्षक एस.ए. पडवळ,पोलीस कर्मचाऱ्यांनी या स्पर्धेस उपस्थिती दर्शविली होती. सरूड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी भूषण यमाटे यांनी खबरदारी म्हणून आरोग्य पथक तैनात ठेवले होते.
तसेच या संस्थेचे प्रदीप घोलप, सिद्धार्थ घोलप, रमेश घोलप, राजू घोलप, पोलीस उपनिरीक्षक उदय काळे, हेमंत तेलवेकर, विश्वास कांबळे, रामदास व्हावळे, अनिल घोलप, पंकज घोलप, डॉ. बी.के. कांबळे व संस्थेचे सभासद यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.