“उदय साखर” च्या चेअरमन पदी “मानसिंगराव गायकवाड” तर व्हा.चेअरमनपदी “पृथ्वीराज खानविलकर”
बांबवडे : उदयसिंगराव गायकवाड सह. साखर कारखाना सोनवडे-बांबवडे च्या चेअरमन पदी मानसिंगराव गायकवाड तर व्हा.चेअरमनपदी पृथ्वीराज खानविलकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. हि निवड सहा. दुय्यम उपनिबंधक ए.एम.चोपडे , संभाजी निकम यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी चेअरमन व व्हा.चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला.
या सत्काराला उत्तर देताना श्री. मानसिंगराव गायकवाड म्हणाले कि, राज्यातील अडचणीत असलेल्या १२ साखर कारखान्यांपैकी एकमेव असा उदयसिंगराव गायकवाड साखर कारखाना सुरक्षित राहिला आहे. हा साखर कारखाना कर्जमुक्त करणे, हे आमचे कर्तव्य असून, यासाठीच हे चेअरमन पद स्वीकारले आहे. जय-पराजयाचे अनेक किस्से आम्ही अनुभवले असून, हा कारखाना कर्जमुक्त करण्यासाठी कणखर व्यक्तिमत्वाची गरज आहे. कारण इथं केवळ बाहेरच विरोधक नाहीत, तर आमच्या आप्तेष्ठापैकी सुद्धा विरोधकांची भूमिका बजावणारी मंडळी काही कमी नाहीत. दरम्यान अथणी शुगर चे श्रीमंत पाटील यांनी या साखर कारखान्याला उभारी दिली आहे. या कारखान्याचे व्हा.चेअरमन पृथ्वीराज खानविलकर हे आमचे निष्ठावंत समर्थक खानविलकर सरकारांचे चिरंजीव आहेत. सरकार आज हयात नाहीत, पण त्यांचे निष्ठेचे त्यांना फळ देणे गरजेचे होते, म्हणूनच पृथ्वीराज यांची व्हा.चेअरमनपदी निवड करण्यात आली असून, त्यांनी त्यांच्या पंचक्रोशीत आपला गट वाढवावा, हि त्यांना एक चांगली संधी आहे.
येत्या सहा महिन्यात शेतीसाठी पाणी पुरवठा संस्था निर्माण करून, कारखान्यास आवश्यक असलेला ऊस याच भागातून निर्माण होईल ,याची खात्री आहे. याच दरम्यान ३६० कोटींचा सहवीज प्रकल्प प्रस्तावित असून, पैकी ६० कोटींचे काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पामुळे अनेक बेरोजगार तरुण नोकरीस लागतील. आमच्यापैकी एकेकाळी ज्यांनी गायकवाड साहेबांच्या कर्तुत्वाची फळे चाखलीत, तीच आत्ता विरोधात गेली आहेत,आणि चेअरमन पदाची स्वप्ने पाहत आहेत. ज्यांनी दारूची दुकाने चालवून इतरांच्या संसाराची राख केली,ती मंडळी साखर कारखान्याचे चेअरमन होणार, अशी स्वप्ने पाहत आहेत. एक वेळ त्यांनी एखादा दारूचा कारखाना काढावा. तसेच शाहुवाडी तालुक्यात वारणानगर निर्माण करू,असे म्हणणाऱ्यांनी आपला शब्द पाळलाच नाही. बरे झाले नाही पाळला , नाहीतर तालुक्यावर सुद्धा ९०० कोटींचे कर्ज काढले असते, असा टोलाही मानसिंगराव यांनी लगावला. दरम्यान या निवडणूक प्रसंगी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील दादा , आमदार सत्यजित पाटील सरुडकर, आमदार अंमल महाडिक यांनी सहकार्य केले.
दरम्यान कारखान्याच्या प्रांगणात माजी खासदार उदयसिंग राव गायकवाड साहेब यांचा भव्य पुतळा उभा करणार असल्याचेही चेअरमन मानसिंग राव गायकवाड यांनी सांगितले.
यावेळी प्रास्ताविक पंडित शेळके यांनी केले.माजी अर्थ शिक्षण सभापती महादेवराव पाटील यांनी आपल्या मनोगतात कळक दऱ्याचे वास्तव सांगताना, त्यावेळी गायकवाड साहेबांबरोबर असणाऱ्या कार्यकर्त्यांनी या कारखान्यासाठी किती परिश्रम घेतले ते कथन केले.
यावेळी कारखान्याचे संचालक रणवीरसिंग गायकवाड, महादेव राव पाटील, राजाराम चव्हाण, गणपती पाटील, पंडितराव शेळके, सुरेश पाटील, बाजीराव लाड, विष्णू दळवी, शंकरराव पाटील, शंकरराव इनामदार,राजाराम आंग्रे, शामराव लाळे, गाणी ताम्हणकर, शेखर येडगे, सौ.ललिता कांबळे, सौ.आशादेवी पाटील, सौ. किरण चौगुले, सौ.बेबीताई पाटील, प्रकाश पाटील थेरगाव, जिल्हा परिषद सदस्य विजय बोरगे, उत्तम मोरे,व कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक भगवान पाटील, दीपक शेळके, दीपक पाटील, अनिल पाटील,व कार्यकर्ते उपस्थित होते.