चिमटा काढला, तर कोपरखळी बसेल – आम.शिवाजीराव नाईक
शिराळा ( प्रतिनिधी ): नागपंचमी पुन्हा दिमाखात साजरी करण्यासाठी, शासन स्तरावरून आमचे प्रयत्न सुरु आहेत. विरोधकांना विकासापेक्षा टीका करण्यात जास्त रस आहे. या पुढे आम्हाला चिमुटा काढला , तर कोपरखळी बसेल, असा इशारा आमदार शिवाजीराव नाईक यांनी विरोधकांना दिला.
शिराळा येथे भाजप व महाडीक युवा शक्तीच्या उमेदवारांच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी बोलत होते.
यावेळी नाईक म्हणाले, स्वार्थी हेतू ठेवून राजकारण करणाऱ्यांना जनताच धडा शिकवेल. नागपंचमीचे पावित्र्य कोणी घालवले ते बघा. मुख्यमंत्री आले असताना, केवळ राजकारणातून बंद पाळण्याचा घाट घातला गेला. मुख्यमंत्री नागपंचमी बाबत भेटण्यास तयार होते. परंतु त्यांना भेटण्याची विरोधकांची पात्रता नाही.
प्रारंभी अंबामाता मंदिरात नारळ वाढवून प्रचार शुभारंभ करण्यात आला. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून प्रचार फेरीची सुरुवात करण्यात आली. ही फेरी मरिमी चौक, तळीचा कोपरा, शिंदे गल्ली, देशमुख गल्ली, गोपाळ कृष्ण पथ, कुरणे गल्ली, सोमवार पेठ येथे आली. त्या ठिकाणी भाजप प्रचार कार्यालयाचे उदघाटन आमदार शिवाजीराव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी रणधीर नाईक, उदयसिंगरव नाईक, सुखदेव पाटील, रणजितसिंह नाईक, अभिजित नाईक, रघुनाथ पाटील, केदार नलवडे, संतोष गायकवाड, संतोष इंगवले, राजन पाटील, वीरेंद्र नाईक, दीपक पवार, महेश पाटील, प्रतापराव नलवडे, उतम निकम, प्रदीप कदम, नरेंद्र सूर्यवंशी, सत्यजित कदम, बबलू शेळके, भगवान मस्के, वैशाली नाईक, गीतांजली पाटील, नेहा सूर्यवंशी, उपस्थित होते.