आयटी क्षेत्र स्वयंपूर्ण करणे, काळाची गरज

जगातील सायबर हल्ल्याने अनेक देशांमध्ये थरकाप उडाला असून, माहिती आणि तंत्रज्ञान धोक्यात आले आहे. जगाचा विचार नंतर करू,पण आपला देश यातून सुरक्षित आहे का? हा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. रँसमवेअर हा व्हायरस जगातील माहिती तंत्रज्ञानाला पुढे करून खुलेआम खंडणी गोळा करीत आहे. अशावेळी आपली यंत्रणा काय करत आहे. गोपनीय खाते, शासनाचे आयटी क्षेत्र काय करतंय,असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकाला पडला, तर त्यात गैर काय ? परंतु आपण एटीएम वापरू नये,असा सर्वसाधारण सल्ला देवून आपणा किती मोठे काम केले असल्याच्या, अविर्भावात शासकीय यंत्रणा आता आपली जबाबदारी संपली, यात खुश आहे.
एकंदरीत आपण किती असुरक्षित आहोत, याचाच हा जिवंत पुरावा आहे. एकीकडे सीमेवर होणारे हल्ले, शहिदांची होणारी विटंबना ,आणि निवृत्त अधिकाऱ्याला अफगानिस्तानातून अपहरणा करून आणून, त्याला फाशी सुनावणे. किती बेधुन्द्पणाचे लक्षण आहे, हेच यावरून दिसते. या सगळ्यासमोर आपण किती हतबल आहोत, याचेही दर्शन होते. कधीकाळी एखादा सर्जिकल स्ट्राईक करून आपले कर्तव्य संपले, अशा अविर्भावात शासन आहे का ? हा प्रश्न सुद्धा समोर येत आहे.
म्हणून आपल्याला अशा ‘सायबर क्राईम ‘ ला संपवण्यासाठी उपाययोजना करणे, काळाची गरज आहे. एकीकडे डिजिटल इंडिया साठी देशाला हाक मारत असताना, आपली यंत्रणा किती तोकडी आहे, याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. कॅशलेस व्यवहारासाठी आपण आग्रह धरतोय, तर दुसरीकडे मात्र त्याच कॅशवर डल्ला मारण्याचे प्लॅनिंग सुरु आहेत. याचाच अर्थ असा होतो कि, आपण जे काही पाऊल उचलू त्याच्याही पुढे जावून शत्रू पक्ष तयारी करत आहे.
एकंदरीत ,आपण खूप प्रगतीच्या वाटेवर चाललो आहोत, असे वाटत असेल, तर तो आपला गैरसमज आहे, हे आता आपल्याला कळून चुकले आहे. आपल्याच देशातील आयटी क्षेत्र स्वयंपूर्ण बनवणे, हि काळाची गरज होवू लागली आहे. त्यासाठी जेवढा निधी लागत असेल, तो पुरवून आपले आयटी क्षेत्र स्वयंपूर्ण करणे, हाच एकमेव उपाय आपल्यापुढे आहे. नाहीतर पाकिस्तान सारखी राष्ट्रे आपल्याला कधी चीतपट करून गेलीत, हे आपल्याला कळणार सुद्धा नाही.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!