मराठी भाषा सक्तीची करा – साहित्य महामंडळाचे अध्यक्ष
बांबवडे ( प्रतिनिधी ) : मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी मराठी चे शिक्षण राज्यात सक्तीचे करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचे संयोजक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पत्राद्वारे केली आहे.
पश्चिम बंगाल मध्ये बंगाली भाषेचा सक्तीचा निर्णय जाहीर करण्यात आला. कन्नड ,मल्याळम पाठोपाठ पश्चिम बंगाल ने हा निर्णय घेतला असून, त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनानेही मराठी सक्तीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच गेली ८५ वर्षे प्रलंबित असलेली, मराठी ही सर्व प्रकारच्या नव्या विद्या, तंत्रज्ञान आदीची संवादभाषा होण्यासाठी सर्वच स्तरांवरील विषयांचे शिक्षण मराठी माध्यमामधून उपलब्ध करून देण्यासाठी मराठी विद्यापीठाच्या मागणीची तसेच महाराष्ट्र अनुवाद अकादमी स्थापन करण्याच्या मागणीचीही पूर्तता करण्यात यावी, हा मुद्दाही या पत्रात ठळकपणे मांडण्यात आला आहे.