राजकीयसामाजिक

” वारणेचा वाघ ” अनंतात विलीन

बांबवडे ( प्रतिनिधी ) : पन्हाळा-गगनबावडा -वैभववाडी मतदारसंघाचे माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील (दादा ) (वय ८८ वर्षे )यांचं हृदय विकाराने निधन झाले. मंत्रालयात “वारणेचा वाघ ” म्हणून एकेकाळी त्यांची ख्याती होती. जनतेत मिसळणारं आणि जनतेला भावलेलं, हे रांगडं व्यक्तिमत्व हरपलं आहे.
ते यशवंत एकनाथ म्हणून प्रसिद्ध होते, तर ‘यशवंत दादा ‘ हे एकेकाळी सर्वसामान्य जनतेच्या हृदयातील एक महत्वाचा भाग होता. दादांची रांगडी भाषा सामान्य जनतेला भावली होती. “माझ्या दादांनो” अशी त्यांनी घातलेली साद आजही जुने कार्यकर्ते विसरलेले नाहीत. त्यामुळे दादांनी काही म्हटलं तर कोणास राग येत नसे.
कुस्ती च्या माध्यमातून आपल्या आयुष्याला सुरुवात केलेले दादा, ग्रामपंचायत सदस्य म्हणून राजकारणात १९५७ साली प्रवेश करते झाले. १९६७ मध्ये जिल्हा परिषदेत सदस्य झाले, तर १९६८ साली कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा प्रतिनिधी बनले. १९७५ ला सर्वोदय विकास सेवा संस्थेत सदस्य झाले, तर १९७६-७७ त्या संस्थेचे ते अध्यक्ष झाले. ग्रामीण जनतेला मुलभूत सेवा मिळवून देत असताना, त्या जनतेशी त्यांची नाळ जुळली, आणी १९७८ पासून ते सलग २५ वर्षे पन्हाळा-गगनबावडा-वैभववाडी मतदारसंघाचे ते आमदार म्हणून कार्यरत राहिले. दादांचा शब्द हा जनतेसाठी आदेश असायचा,असेच दादांचे आणि सामान्य जनतेचे नाते होते. दादा त्यावेळी प्रत्येकाला नावानिशी ओळखायचे, हीच त्यांची ख्याती होती. जनतेच्या प्रश्नासाठी आपल्याच पक्षातील वरिष्ठांशी संघर्ष करायला त्यांनी कधी मागे-पुढे पहिले नव्हते. म्हणूनच पक्षात दादांचा आदरयुक्त दरारा होता.
जनतेला भावलेलं हे, रांगडं व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेलं आहे. त्यांच्या पश्चात चिरंजीव माजी जि.प.सदस्य अमरभाऊ पाटील, नातू डॉ.संजय पाटील, सुना नातवंडे असा परिवार आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!