” लाख मरो, पण लाखांचा पोशिंदा न मरो “
बांबवडे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरु केलेली आत्मक्लेश यात्रा, आज सहाव्या दिवशी पनवेल -बेलापूर ला पोहचत आहे. खऱ्या अर्थाने हा आत्मक्लेश ठरत असून आजपर्यंत सुमारे १५० किलोमीटर चे अंतर या मंडळींनी पायी पार केले आहे.
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, त्यांचा सातबारा कोरा व्हावा, यासाहीत अनेक प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी हि यात्रा दि.३० मे रोजी राजभवनावर धडकणार आहे, आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचा आवाज मंत्रालयातील बाबू मंडळींच्या कानात घुमणार आहे.
ज्या पक्षाला साथ देवून सत्ता सुपूर्द केली, त्याच पक्षाने मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांना बगल देवून, त्यांच्या तोंडाला पाने पुसली,अशा शासनाला आपण का मदत केली, या हेतूने हि आत्मक्लेश यात्रा असून, शासनाला जाग आणणे हा त्याचा मुख्य हेतू आहे.
राज्याचे कृषिमंत्री शेतकऱ्यांच्या नावाने शासनात दाखल झाले खरे, पण एकेकाळी स्वभिमानीची मुलुख मैदानी तोफ असलेले नेते नामदार सदाभाऊ खोत, आज मात्र शेतकऱ्यांच्या या आत्म्क्लेशापासून दूर आहेत. एकेकाळी हीच व्यक्ती शेतकऱ्यांसाठी शर्टाच्या बाह्या सरकवून तयार असायची. पण आज मात्र परिस्थिती वेगळी झाली आहे. स्वभिमानीच्या मुलुख मैदानी तोफेच्या दारूत पाणी पडल्याने ती शांत झाली आहे का ? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. शासन शिवार संवाद यात्रा काढत आहे, पण त्यात मंत्र्यांनी सांगेल त्यांनीच बोलायचे, असेही आरोप होवू लागले आहेत. शिवार संवादामध्ये शिवारातल्या लोकांनी बोलायचे नाही, तर मग कुणी बोलायचे हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.
आज नामदार सदाभाऊ स्वाभिमानी सोबत आहेत कि,नाही ? याचेही स्पष्ट उत्तर अद्याप मिळत नाही. कारण संबंधित मंडळीना ” धरलं तर चावतंय,आणि सोडलं तर पळतंय,” अशी परिस्थिती होवून बसली आहे. शेतकऱ्यांचा कैवार घेणे तितके सोपे नाही, त्यासाठी सर्वस्वाचा त्याग करावा लागतो. रघुनाथदादा यांनीही १ जून पासून शेतकरी संपाचे हत्यार उपसले आहे. एकंदरीत प्रत्येकालाच जर शेतकऱ्याला मदत करायची असेल, तर सवता सुभा कशाला? असो. या आत्मक्लेश यात्रेत खासदार राजू शेट्टी यांच्या सोबत सागर शंभू शेटे, रविकांत खोपकर, प्रकाश पोपळे, भवान पाटील, अजित पवार, राजेंद्र गड्यानवार ,महिला प्रदेश अध्यक्षा रसिकाताई ढगे व अनेक कार्यकर्ते, शेतकरी आहेत.
आत्मक्लेश यात्रेत दररोज सुमारे दीड हजार र्लोक सामील होत आहेत. हे शेतकऱ्यांच्या सहानुभूतीसाठी काही कमी नाही. कारण ” लाख मरो, पण लाखांचा पोशिंदा न मरो ” .