” बळीराजाच्या पाठीशी आत्ता उभे रहा, हा जगाचा पोशिंदा आयुष्यभर आपल्या पाठीशी उभा असेल.”

बांबवडे : आजपासून बळीराजा संपावर निघालांय… होय,संपावर. आजपर्यंत अनेक कामगारांनी संप केला, अनेक संघटनांनी देखील आपल्या संपाच्या हत्यारावर शासनाला आपली मागणी मान्य करण्यास भाग पाडले. म्हणूनच आज या हत्याराचा काय उपयोग होतोय, ते पाहण्यासाठी हाच बळीराजा संपावर गेला.
प्रत्येकाला आपल्या मागण्या मांडण्याचा अधिकार आहे. आणि काही काळानंतर त्या मागण्या शासन मंजूरही करतं. पण शेतकऱ्याबाबत मात्र हाच न्याय उलटा होत निघाला आहे. शेतकऱ्याचा सातबारा कोरा व्हावा, शेती मालाला हमीभाव मिळावा, स्वामिनाथन आयोग लागू व्हावा, इतर शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे पेन्शन लागू व्हावी,अशा अनेक मागण्या शासनाच्या लाल फितीत बंद का आहेत? हा प्रश्न आजवर अनुत्तरीत आहे. ऊसाला पाचशे रुपये भाव वाढवून मिळवण्यासाठी शेतकऱ्याला रस्त्यावर उतरावे लागते. जो शेतकरी तुमच्या कोणत्याही व्यवहारात नाक खुपसत नाही. तुमचे सगळे निर्णय बिनबोभाट मान्य करतो. अशा शेतकऱ्याला स्वतः पिकवलेल्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार नाही?काय हि अवस्था. आज कोणतीही कंपनी आपण उत्पादित केलेल्या उत्पादनाचा भाव स्वतः ठरवते,आणि बाजारात विक्रीस आणते. त्यावेळी प्रत्येकजण त्या कंपनीच्या दराला हो,म्हणतो , मग शेतकऱ्याच्या मालाला का दर नाही? याचे कारण एकच आहे, ते म्हणजे शेतकरी काय करणार? तो हतबल आहे, अधिक काळ संपाच्या मुद्द्यावर टिकू शकणार नाही, कारण त्याच्याकडे त्याने उत्पादित केलेला माल साठवण्यासाठी साधन नाही. तसेच त्याचा माल हा नाशवंत असतो. त्यामुळे थोडाकाळ मंदी दाखवली,कि आपोआप त्याच्या मालाचे भाव कमी आणेल. आणि हि वस्तू स्थिती आहे. सकाळी २०रु.किलो असलेला माल, राहिला तर संध्याकाळी पाच रु.किलोने शेतकरी तो माल विकतो आणि जातो. कारण त्याच्याकडे साठवणुकीचे साधन नाही. तसेच जर आज हा माल परत न्यावा लागला, तर वाहतूकीचा दुसरा बोझा त्याच्या अंगावर पडणार असतो. म्हणून तो येईल त्या भावात आपला माल विकतो, आणि खिन्न मनाने येईल ते रुपडे पदरात बांधून परत निघून जातो. काय हि व्यथा,आणि दुर्दशा.
आजपर्यंत शेतकऱ्याला शासन समजून का घेत नाही? कि,” बळी तो कान पिळी ” अशीच अवस्था आहे. आज देशात चतुर्थ श्रेणी कामगाराला सुद्धा शेतकऱ्या पेक्षा अधिक पैसे मिळतात. त्याला कमी का होईना, पण पेन्शन मिळते. शासकीय कर्मचाऱ्याला मिळणाऱ्या सगळ्या सुविधा त्याला मिळतात. मग शेतकऱ्याने आपल्या मालाला हमीभाव मागितला, तर कुठे आकाश कोसळले. शासकीय कर्मचाऱ्या ला , अनेक वेतन आयोग मिळतात, मग असे आयोग शेतकऱ्यांसाठी का नाहीत? महागाई भत्ता, डीअरनेस अलौन्स, हे सगळे न मागता मिळते, मग शेतकऱ्याला मागून का मिळत नाही?
आज शेतकरी संपावर निघालांय, त्याचं मनोधैर्य वाढवण्यासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे. इतर शासकीय कर्मचाऱ्या ला ह्या सुविधा का मिळतात? याबाबत शेतकऱ्याची अजिबात तक्रार नाही. पण त्याच्या मालालासुधा हमीभाव मिळावा ,हि त्याची मागणी अवास्तव नाही. तेंव्हा या बळीराजाच्या पाठीशी आत्ता उभे रहा, हा जगाचा पोशिंदा आयुष्यभर आपल्या पाठीशी उभा असेल.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!