शेतकऱ्यांचा संप मागे : पुणतांबे तील शेतकऱ्यांचा विरोध मात्र कायम
मुंबई : शेतकरी संघटनेच्या ७० % मागण्या मान्य करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांचा संप मागे घेण्यात आला असून, येत्या सहा महिन्यात मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा सर्व महाराष्ट्रभर संपाचे हत्यार उगारण्यात येईल, असे किसान क्रांतीचे जयाजी सूर्यवंशी यांनी सांगितले. दरम्यान पुणतांबे येथील शेतकऱ्यांनी मात्र या निर्णयाने संतुष्ट नसून, जोपर्यंत शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत संप सुरु राहील, असे सांगण्यात येत आहे.
काल रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या ७०% मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. यामुळे गेले दोन दिवस सुरु असलेला शेतकऱ्यांचा संप मागे घेण्यात आला आहे.
यावेळी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेत राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार असल्याची, घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. यासाठी सरकारकडून एक समिती स्थापन करण्यात येणार असून, हि समिती ३१ ऑक्टोबर पर्यंत आपला अहवाल शासनाला सादर करणार आहेत. तसेच दुधाचे भाव वाढवण्या संदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. येत्या २० जूनपर्यंत त्याची किमत ठरवण्यात येणार आहे. आंदोलनात ज्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला,त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला सरकार आर्थिक मदत करणार आहे.
मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीतील महत्वाचे मुद्दे :
हमीभावापेक्षा कमी भाव देणे ,हा फौजदारी गुन्हा ठरवण्यात येईल. येत्या अधिवेशनात तसा कायदा करण्यात करण्यात येईल.
राज्य कृषि मूल्य आयोगाची स्थापना करण्यात येणार आहे.
वाढीव बिलाचे व्याज आणि दंडव्याज रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येईल
शीतगृह साखळी निर्माण करणार
नाशवंत शेतमालासाठी प्रक्रिया उद्योग आणणार
शेतकऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेणार
यावर मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेवून ७० % मागण्या मान्य केल्या आहेत.