चाकूर येथील धनगरवाडी इथं ‘ करणी-भानामाती ‘ मुळे शेण खाऊ घालण्याचा अभद्र प्रकार
लातूर : लातूर जिल्ह्यातील ,चाकूर तालुक्यातील धनगरवाडी येथे करणी-भानामती च्या संशयाने एका १७ वर्षीय मुलीसह एका महिलेला मारहाण करून शेण खाऊ घालण्याची घटना समोर आली आहे. या प्रकारचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर हि घटना समोर आली. या प्रकरणी जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी कि, चाकूर तालुक्यातील धनगरवाडी इथं ५ जून रोजी हा प्रकार घडला आहे. येथील प्रभाकर केसाले आणि इतर चार जणांनी गावातील दोन महिलांना तुम्हाला करणी आणि भानामती झाली आहे,असे सांगून एके ठिकाणी नेले.
येथे १७ वर्षीय मुलीसह महिलेचे हातपाय धरून मारहाण करण्यात आली. त्यांना शेण खाण्यास देण्यात आले. या दोन महिला गावातील एका व्यक्तीच्या आधारे करणी-भानामती करतात,असे भासविण्यासाठी तालुक्यात हा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला होता. यामुळे या महिलांची गावातून बदनामी होवू लागली. यामुळे सोपान मुंडकर यांनी चाकूर पोलिसात तक्रार केली.
चाकूर पोलिसांनी १२ जून रोजी रात्री जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत एका महिलेसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.