शिराळा नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीच्या फक्त ‘सुनंदा सोनटक्के ‘ यांचाच अर्ज

शिराळा,ता.१३: शिराळा नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीसाठी भरलेला अर्ज, आज भाजपाच्या नेहा सूर्यवंशी व सीमा कदम यांनी मागे घेतला . त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सौ. सुनंदा सोनटक्के यांचा नगराध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. अधिकृत घोषणा १५ जूनला होणार आहे. उपनगराध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता लागली आहे.
नगराध्यक्षपदासाठी ७ जूनला भाजपा च्यावतीने नेहा सूर्यवंशी, सीमा कदम तर राष्ट्रवादी कडून सुनंदा सोनटक्के यांनी उमेदवारी अर्ज निवडणुक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांचेकडे दाखल केले होते.
छाननीत तिन्ही अर्ज वैध झाले होते. मात्र प्रभाग क्रमांक ४, ६, १५ हे नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री साठी राखीव असल्याने त्या प्रभागातून निवडून आलेल्याचे अर्ज वैध ठरवावेत. राष्ट्रवादीच्या सुनंदा सोनटक्के त्या प्रभागातून निवडून आल्या नसल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरवावा, अशी तक्रार भाजप च्या नेहा सूर्यवंशी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र जाधव यांचेकडे केली होती. त्यावर गुरुवारी ८ जून रोजी सुनावणी झाली. त्यावेळी सूर्यवंशी यांचा अर्ज फेटाळण्यात आला. आज अर्ज माघारीचा दिवस होता. भाजपा च्या नेहा सूर्यवंशी व सीमा कदम यांनी अर्ज माघारी घेतले आहेत.
शिराळा नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादीचे ११ तर भाजपा चे सहा उमेदवार निवडून आले आहेत. या नगरपंचायत मध्ये राष्ट्रवादीची सत्ता असल्याने व सुनंदा सोनटक्के यांचा एकच अर्ज असल्याने त्यांची नगराध्यक्ष म्हणून निवड निश्चित झाली आहे. अधिकृत घोषणा १५ जूनला होणार आहे. आता उपनगराध्यक्ष कोण होणार, याची उत्सुकता लागली आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page
error: Content is protected !!