शेतकऱ्यांना ४% दराने पीक कर्ज देणार
नवी दिल्ली : राज्य सरकार पाठोपाठ केंद्र सरकार देखील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणार असून, यासाठी केंद्र शासनाने २०,३३९ /-कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. देशाच्या विविध राज्यातून अन्नदात्याच्या कर्जमाफीची मागणी होत असताना, मोदी सरकार ने घेतलेल्या या निर्णयाचे कौतुक करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांना फक्त ४ टक्के दराने पीक कर्ज उपलब्ध करून देण्याच्या निर्णयावर आज केंद्रीय मंत्रिमंडळानं शिक्कामोर्तब केलं. त्यांना हा दिलासा देण्यासाठी, पीक कर्जाच्या व्याजावरील अनुदानासाठी केंद्र सरकार चालू आर्थिक वर्षात २०,३३९ कोटी रुपये खर्च करणार आहे.
अल्पकालीन पीक कर्जावर केंद्र सरकारतर्फे सरसकट दोन टक्के सवलत देण्यात येईल. म्हणजेच ९ टक्के दराने मिळणारं कर्ज त्यांना ७ टक्के व्याजदराने मिळेल. पण, जे शेतकरी व्याजाचे हप्ते वेळच्या वेळी भरताहेत, त्यांना अनुदानाशिवाय आणखी ३ टक्क्यांचा फायदा होणार आहे. त्यांच्या पीक कर्जावरील एकूण पाच टक्के व्याज सरकार भरणार आहे. अर्थात, त्यांना ३ लाखांपर्यंतचं पीक कर्ज फक्त चार टक्के दराने उपलब्ध होऊ शकेल.