परिस्थितीशी झगडत मिळवलेलं यश कौतुकास्पद : विशाल सुवारे- बांबवडे
बांबवडे : मार्च मध्ये झालेल्या १० वी च्या परीक्षांचे निकाल लागले. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुकही झाले. ते व्हायला देखील पाहिजे. कारण कौतुकाची एक थाप विद्यार्थ्याला दहा हत्तींचं बळ देते. त्यातूनही गरिबीच्या परिस्थितीतून मिळवलेले ९० % गुण हे सगळ्यांत जास्त कौतुकाचे आहेत. आणि हे गुण मिळवलेत नोकरीनिमित्त बांबवडे इथं रहाणाऱ्या ‘विशाल गणपत सुवारे ‘ याने.
विशाल हा महात्मा गांधी विद्यालय बांबवडे या शाळेत शिकत आहे. त्याचे वडील नोकरी करतात,आईसुद्धा मोलमजुरी करते. विशाल ला एक लहान भाऊ देखील आहे. गणपत सुवारे हे मुळचे कोकणातील पाली येथील रहिवासी आहेत. पण नोकरी धंद्यानिमित्त विशाल चे कुटुंब बांबवडे मध्ये स्थायिक झाले आहे.
आर्थिक दृष्ट्या हे कुटुंब खूप गरीब आहे. त्यामुळे शिकवण्या वगैरेंचा प्रश्नच येत नाही. शाळा आणि तेथील शिक्षक जे मार्गदर्शन करतील. तोच विशाल चा ‘ दीपस्तंभ ‘. पण याच दीपस्तंभामुळे विशाल ने ९० % पर्यंत मजल मारली आहे. पुढील शिक्षण कसे होणार हा एक अनुत्तरीत प्रश्न आहे. परंतु विशाल ची जिद्द, चिकाटी, आणि अभ्यासू वृत्ती विशाल ला भावी आयुष्यात उज्वल भविष्याकडे नेल्याशिवाय राहणार नाही.
प्रवाहाच्या विरोधात टिकून राहून विशाल ने मिळवलेले ९० % गुण, निश्चितच विशालला ९५ टक्क्यांच्यापुढे नेते. अशा प्रवाहाशी ,आणि परिस्थितीशी झगडत मिळवलेल्या यशाचं कौतुक खरंच सर्व समाजान करणं गरजेचं आहे.