*श्रीपूजक अजित ठाणेकर यांना मारहाण*

कोल्हापूर: अंबाबाई मंदीराचे श्रीपूजक आणि नगरसेवक अजित ठाणेकर यांना गुरुवारी पुजारी हटाओ मोहिमेच्या आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलाविण्यात आलेल्या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासमोरच मारहाण केली. महिला आंदोलकांनी त्यांना कपडे फाटेपर्यंत मारहाण केल्यानंतर पोलिस बंदोबस्तात त्यांना बाहेर नेण्यात आले. तरीही आंदोलकांचा राग शांत झालेला नव्हता. दरम्यान. पुजारी हटाओ या मागणीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तीन महिन्यात अहवाल द्यावा, असा निर्णय चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्यानंतर ही बैठक संपली.

अंबाबाई देवीला मागील शुक्रवारी पुजारी बाबूराव ठाणेकर व अजित ठाणेकर यांनी पारंपरिक काठा-पदराची साडी न नेसविता भाविकाने दिलेला चोली-घागरा नेसविला. या वादाचे पर्यवसान शनिवारी (दि. १७) जनप्रक्षोभात झाले. गेले आठवडाभर कोल्हापूरात अंबाबाई मंदिरातील ‘पुजारी हटाओ’ आंदोलन भाविकांनी सुरु केले आहे. अंबाबाईला घागरा-चोली नेसविल्याच्या प्रकार उघड झाल्यानंतर या आंदोलनाने वेग घेतला. मंदिरातील पुजाऱ्यांनी अनेक भ्रष्ट मार्ग अवंलबल्याचे दाखले देत आंदोलकांनी हे आंदोलन व्यापक केले होते. यासंदर्भात ‘करवीरनिवासिनी अंबाबाईस चोली-घागरा नेसविणाऱ्या व राजर्षी शाहू महाराजांचा अपमान करणाऱ्या पुजाऱ्यांना मंदिरातून बाहेर काढ व त्यांना सुबुद्धी दे,’ असे साकडे घालणारे आंदोलन शेकडो सर्वपक्षीय भक्तांनी रविवारी अंबाबाई मंदिरात केले. जिल्हाधिकारी सुभेदार यांनाही आंदोलकांनी निवेदन दिले होते. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत गुरुवारी दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीला आधी केवळ आंदोलकांच्या मोजक्या प्रतिनिधींनाच बोलावण्याचे नियोजन होते. याबाबत बैठकीची जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती देताच आंदोलकांनी केवळ प्रतिनिधींशी नाही तर सर्व नागरिकांसमवेत समन्वय बैठक लावा, अशी जोरदार मागणी केली जी जिल्हाधिकाऱ्यांना मान्य करावी लागली. त्यामुळे गुरुवारी झालेल्या या बैठकीला भक्तांची लक्षणीय उपस्थिती होती.

अंबाबाईला घागरा चोली घातल्याबद्दल श्रीपूजकांनी प्रायश्चित घ्यावे आणि देवीसमोर दोन दिवस उपवास करावा, असा तोडगा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मांडला, मात्र आंदोलकांनी त्यास विरोध दर्शविताच बैठकीला उपस्थित असलेले श्रीपूजक अजित ठाणेकर आंदोलकांसमोर हसत हसत सामोरे आले. त्यामुळे भडकलेल्या आंदोलकांनी ठाणेकर यांनी बाहेर जावे, अशी मागणी केली. परंतु ठाणेकर यांनी बाहेर जाण्यास नकार दिला. त्यामुळे आंदोलकांनी त्यांना मारहाण सुरु केली. पाठोपाठ महिला आंदोलकांनी ठाणेकर यांचा ताबा घेत त्यांना कपडे फाटेपर्यंत मारहाण केली. पोलिसांनी हस्तक्षेप करुन ठाणेकर यांना बाहेर काढले.

दरम्यान. पुजारी हटाओ या मागणीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तीन महिन्यात अहवाल द्यावा, असा निर्णय चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्यानंतर ही बैठक संपली.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!