गोगवे चे शहीद जवान श्रावण माने यांना मुस्लीम बांधवांची अनोखी श्रधांजली
बांबवडे : गोगवे (ता.शाहूवाडी) गावातील मुस्लीम बांधवांनी पारंपरिक रमजान ईद साजरी न करता शहीद जवान श्रावण माने यांच्या प्रती सद्भावना व्यक्त करून, अनोखी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. योगायोगाने सोमवारी या जवानाच्या रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम होत असताना, दुसरीकडे लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची जयंती होती. अशावेळी येथील मुस्लिम समाज बांधवांनी, आपल्या प्रत्यक्ष कृतीतून सामाजिक न्याय दिनाला खऱ्या अर्थाने न्याय दिल्याची प्रतिक्रिया, तालुक्याच्या सर्व भागातून व्यक्त केली जात आहे.
शाहुवाडी तालुक्यातील गोगवे गावचे सुपुत्र श्रावण माने हे कर्तव्य बजावत असताना, पुँछ प्रांतातील सीमेवर शहीद झाले. त्यामुळे संपूर्ण गोगवे गाव दुःखाच्या सागरात बुडून गेलेले आहे. योगायोगाने या अमर योद्ध्याच्या रक्षाविसर्जना दिवशीच मुस्लीम बांधवांचा पवित्र समजला जाणारा ‘ रमजान ईद ‘ हा सुद्धा या दु:खाच्या प्रसंगात आल्याने गावातील सात कुटुंबातील मुस्लीम बांधवांनी हा सण साजरा न करता आपल्या गावच्या शहीद सुपुत्राला एक आगळीवेगळी श्रद्धांजली वाहिली आहे. मुस्लीम समाजाच्या वतीने शौकत मणेर, राजू मणेर यांनी ही माहित दिली आहे.
गावातील हिंदू-मुस्लीम ऐक्याचा दाखला समाजासमोर ठेवताना गोगवे गावातील शौकत अहमद मणेर, सलीम अहमद मणेर, अस्लम मणेर, रमजान तांबोळी, जमीर मिरासाहेब मणेर, फिरोज हनीफ मणेर, सत्तार ताजुद्दीन मणेर, राजू गुलाब मणेर, यासीन गुलाब मणेर, सलीम गुलाब मणेर, अस्लम गुलाब मणेर या मुस्लीम समाजातील सर्व कुटुंबियांनी एकमुखाने हा निर्णय घेतल्याचेही मणेर यांनी यावेळी स्पष्ट केले.