पावन झाली धरती, आणि पवित्र झाले अंगण, भारतमाते तुझ्याचसाठी अर्पण केले जीवन
बांबवडे : गोगवे तालुका शाहुवाडी येथील शहीद जवान श्रावण बाळकू माने यांचा रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम संपन्न झाला. माने कुटुंबियांच्या घरावर शोककळा पसरल्याचे काळे कभिन्न पडसाद दिसत होते. अवघ्या चोविसाव्या वर्षी या तरुणाने आपले जीवन भारतमातेच्या चरणी अर्पण केले.
श्रावण यांच्या सर्व अपेक्षा स्वप्नांमध्येच राहिल्या.त्या गावची माती देखील हुंदका देत असेल, त्या घराचे अं गण देखील सूनं झालं असेल, आणि एका भाबड्या अपेक्षेत राहील कि, माझा श्रावण बाळ कधीतरी परतून येईल. कडक वर्दीतील त्या जवानाला पाहण्याची अजूनही आस तिथल्या अंगणाला लागली आहे. त्या गावची माती आजदेखील त्याच्या परत येण्याची आतुरतेने वाट पाहत असेल. परंतु ‘ आता नाही येणे जाणे, सहज खुंटले बोलणे ‘ तुकाराम महाराजांच्या या ओव्यांमध्येच परतीचे दोर तुटल्याचे व्यतीत होत आहे.
आजही रक्षाविसर्जन कार्यक्रमासाठी अनेकजण या वीर जवानाला सलाम करण्यासाठी आले होते.