‘ शासकीय इतमाम ‘ म्हणजे नक्की काय ?
बांबवडे : गोगवे तालुका शाहुवाडी येथील जवान श्रावण माने हे पाकिस्तानशी दोन हात करताना शहीद झाले. या वीर पुत्राने आपले कर्तव्य निष्ठेने बजावले. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले, असं जरी म्हटलं जात असेल, तरी याबाबत कोणताही खर्च शासकीय विभागाने उचललेला दिसत नाही. केवळ बंदुकीच्या फैरी झाडून दिलेली सलामी म्हणजेच शासकीय इतमाम म्हणायचे का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकाला पडला आहे.
या शहीद जवानाच्या बलिदानाची किंमत न मोजता येणारी असतानाही, त्यांच्या अंत्यविधीचा खर्च मात्र उचलला गेला नाही,हे ह्या देशाचे पर्यायाने जिल्ह्याचे दुर्दैव आहे. याबाबत चा खर्च शासनाच्या बांधकाम विभागाने करावयाचा असतो ,असं समजतं. याचा अर्थ तो खर्च करण्याची कुणाची कुवत नाही,असा होत नाही. परंतु जर आपण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले, असं जर म्हणत असू, तर त्याचा खर्च शासनाने उचलणे क्रमप्राप्त ठरते. ज्या जवानाने देशासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला,त्याच्या अंत्यविधीचा खर्च सध्या तरी गावातील तरुण मंडळींनी केला आहे. ह्या खर्चाची रक्कम महत्वाची नसून तो खर्च शासनाने करणे,गरजेचे होते. अशा कामासाठी तरी शासकीय कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवावी, अशी मागणी ग्रामस्थांतून चर्चेला येत आहे.