एसटी वर झाडाची फांदी पडल्याने शाहुवाडी तालुक्यातील २ प्रवाशी जखमी : शिराळा तालुक्यातील घटना
शिराळा : शिराळा-इस्लामपूर या मुख्य रस्त्यावर रेड गावच्या हद्दीत वठलेल्या वडाच्या झाडाची फांदी तुटत असताना ती आपल्या एसटी बस वर पडू नये, यासाठी एसटी चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने बसमधील दोन प्रवाशी जखमी झाले, तर एसटी बस ची काच फुटून सात हजाराचे नुकसान झाले आहे. हि घटना आज दि.५जुलै रोजी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत चालक तानाजी दत्तू पाटील (वय ४७ वर्षे) यांनी शिराळा पोलीस ठाण्यात नोंद केली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, चालक तानाजी पाटील हे एसटी क्र.MH११ – T-९२८६ हि बस मलकापूर ते नाशिक प्रवाशी घेवून जात होते. दरम्यान रेड गावाच्या हद्दीत पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास वठलेल्या वडाच्या झाडाची फांदी तुटून पडत असताना पाटील यांनी पहिली. त्यापासून बचाव करण्यासाठी त्यांनी ब्रेक दाबला, तरीही ती फांदी गाडीवर न पडता गाडीच्या काचेला घासून पडली, त्यात एसटी ची पुढील काच फुटून सात हजार रुपयांचे नुकसान झाले. दरम्यान ब्रेक दाबल्याने गाडीतील प्रवाशी सौ.सुवर्णा संभाजी जाधव (वय ३० वर्षे ) रहाणार शाहुवाडी जिल्हा कोल्हापूर, सौ.सविता प्रदीप ढाके (वय ३२ वर्षे ) रहाणार माण-परळे तालुका शाहुवाडी जिल्हा कोल्हापूर ,या दोघी जखमी झाल्या आहेत.