पद्म पुरस्कारांसाठी २५०० मानांकाने
नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) : २०१८ च्या पद्म पुरस्कारांच्या नामांकनाची प्रक्रिया सुरु झाली असून, आत्तापर्यंत केंद्र सरकारकडे २५०० नामांकने आली आहेत.
२०१८ च्या पद्म पुरस्कारांसाठी वेगवेगळ्या क्षेत्रांतून सुमारे २५०० नामांकने आली असल्याची माहिती, केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहे. गेल्यावर्षी पद्म पुरस्कारांसाठी १८,७६१ नामांकने आली होती.
यंदा केंद्रीय गृह मंत्रालयाने तयार केलेल्या www.padmaawards.gov.in या पद्म पोर्टलवर पद्म पुरस्कारांसाठी फक्त ऑनलाईन नामांकने किंवा शिफारशी स्वीकारल्या जात आहेत. यासाठी नामांकन करण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०१७ आहे.
भारतातील तसेच भारताबाहेरील राजकारण, साहित्य, कला, क्रीडा, सामाजिक, विज्ञान, यांसारख्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पद्म पुरस्कार दिला जातो.
अशा व्यक्तींच्या शिफारस राज्य शासन, मंत्रालये, केंद्र शासन, भारतरत्न आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेते, केंद्र आणि राज्यमंत्री , राज्यातील मुख्यमंत्री आणि राज्यपाल, खासदार यांसारख्या व्यक्ती केंद्र शासनाकडे करतात.
यावर्षी पुरस्कार वितरण प्रक्रियेत पारदर्शकता यावी म्हणून, सामान्य नागरिकांचाही सहभाग यात करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व सामान्य व्यक्ती सुद्धा पुरस्कारांविषयी शिफारस करू शकतात.
दरम्यान प्रजासत्ताकदिनाच्या पूर्व-संध्येला पद्म-विभूषण, पद्मभूषण,आणि पद्मश्री या पुरस्कारांची यादी घोषित केली जाणार आहे.